डॉलरच्या तुलनेत ६१ पर्यंत खाली गेलेल्या रुपयाला सावरण्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजना उलट मारकच ठरत असल्याचे दर्शवीत स्थानिक चलन शुक्रवारी ६२ या नव्या नीचांक पातळीपर्यंत रोडावले. एकाच आठवडय़ातील दुसऱ्यांदा झालेले चलनाचे हे नीचांकी अवमूल्यन भांडवली बाजाराच्या मोठय़ा घसरणीलादेखील कारणीभूत ठरले. दिवसभरात ६२.०३ या तळाला गेलेला रुपया बुधवारच्या तुलनेत २२ पैशांनी खालावत ६१.६५ या नव्या खोलात जाऊन दिवसअखेर विसावला.
बुधवारी भांडवली बाजार तसेच परकी चलन व्यवहाराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने उशिरा विदेशी चलनाचा देशाबाहेर जाण्याचा मार्ग विविध उपाययोजनांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पडसाद शुक्रवारी परकी चलन व्यवहारावर उमटले. व्यवहाराची सुरुवात करताना रुपया १० पैशांनी उंचावत ६१.३३ पर्यंत झेपावला खरा पण त्यानंतर त्याच्या गंटागळ्या सुरू झाल्या.
चलनाने बुधवारअखेर ६१.४३ चा स्तर गाठताना ऐतिहासिक नीचांक नोंदविलाच होता. तर आज कालच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टीनंतर व्यवहार झालेल्या सलग दुसऱ्या दिवशी त्याने  नवीन नीचांक दाखविला. एकाच आठवडय़ात सलगच्या व्यवहारात अवमूल्यनाचा नवा विक्रम परकी चलन व्यवहारात प्रथमच अनुभवास आला आहे.
..तर अर्थव्यवस्थेतील रोख पूर्णत: आटेल : सरकारचा दावा
डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकाला पोहोचलेल्या रुपयाला सावरण्यासाठी जोमाने प्रयत्न केल्यास अर्थव्यवस्थेतील रोख पूर्णत: आटून जाईल, असा दावा करीत केंद्र सरकारने शुक्रवारी भांडवली बाजाराच्या पतनाला आणि स्थानिक चलनाच्या अवमूल्यनाला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घडामोडी कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे.
सकाळच्या व्यवहारातच रुपयाने प्रति डॉलर ६२ असा सार्वकालिक नीचांक नोंदविल्यानंतर नवी दिल्लीतून जारी केलेल्या निवेदनाद्वारे सरकारने म्हटले आहे की, जगभरात जे चित्र आहे तेच येथील अर्थव्यवस्थेतही पाहायला मिळत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरण्याच्या संकेताने येथील चलन अधिक कमकुवत बनत आहे. घसरत्या रुपयाचा भांडवली बाजारावरही विपरीत परिणाम झाला आहे. तर या बाजारातील ऱ्हासदेखील ढासळत्या रुपयामुळेच आहे. चलनातील घसरण पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न सरकार किंवा रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत होणार नाही. कारण तसे केले तर अर्थव्यवस्थेतील तरलता संकुचित होईल. चालू खात्यातील वाढत्या तुटीच्या दबावापोटीदेखील रुपयात घसरण होत आहे. विकासाला मारक न ठरतादेखील चलनातील अवमूल्यन रोखता येईल. अर्थव्यवस्थेला पोषक असा रुपयाचा स्तर लवकरच पाहायला मिळेल, असे आश्वासक विधानही सरकारमार्फत करण्यात आले.