इंडोको रेमेडिजच्या गोव्यातील नव्या प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. कंपनीच्या या प्रकल्पाला (एक) अमेरिकेकडून स्थापना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्य हाती घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, गोवा प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर इंडोको रेमिडिजचा समभाग मंगळवारच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात तब्बल १७.४४ टक्क्य़ांपर्यंत झेपावला. दिवसअखेर तो सोमवारच्या तुलनेत ११ टक्क्य़ांपर्यंत वाढत २९६.७५ वर स्थिरावला.
इंडोको रेमेडिजच्या या प्रकल्पाची औषधनिर्मिती क्षमता ३ अब्ज गोळ्या, ३.१० कोटी द्रव औषधे बाटल्या, १.५० कोटी मलम टय़ुब तसेच ६ कोटी जिलेटीन कॅप्सुल असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर यांनी दिली.