शेअर बाजारात निर्देशांकांची त्यांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. जगातील प्रमुख शेअर निर्देशांकांनी तर त्यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या उच्चांकांपल्याड मजल मारली आहे, तरी विदेशी गुंतवणूकदारांकडून आपल्या शेअर बाजारात खरेदीचा धो-धो ओघ सुरू आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अनुकूलता दर्शविली गेल्यास, शेअर बाजारात तेजीचा कळसाध्याय साधला जाण्याबाबत वित्तीय जगतात एकमत बनताना दिसत आहे. तर मग सामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात आपली पुंजी घालण्याची सर्वोत्तम घडी आहे काय, हा या समयी लाखमोलाचा प्रश्न निश्चितच बनला आहे. म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांचे याला होकारार्थी उत्तर आहे, मात्र ही गुंतवणूक पुरेशा सबुरीने म्हणजे तीन ते पाच वर्षे अशा दीर्घावधीसाठी आणि सुनियोजित पद्धतीने व्हायला हवी. अर्थात ती थेट शेअर बाजारात जाण्यापेक्षा म्युच्युअल फंडातून प्रवाही व्हावी, असेच बहुतांशांनी सुचविले आहे.
देशाच्या भांडवली बाजारात निर्देशांकाने दमदार वाटचाल सुरू ठेवली असली तरी अद्याप आपल्या जानेवारी २००८ मधील २१ हजारांच्या उच्चांकाला सर केलेले नाही. दुसऱ्या बाजूला गेल्या पाच-साडेपाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांचा परतावा फारसा उत्साहवर्धक राहिलेला नाही. परंतु येणारा काळ उत्तम परताव्याचा राहील आणि आगामी दोन-तीन वर्षे ही मागची सर्व कसर भरून काढणारी ठरेल, याबाबत निधी व्यवस्थापक पुरता विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.
गुंतवणूकदारांनी आपल्या भागभांडारात आता समभागांचा (इक्विटी) समावेश करावा अशी वेळ निश्चितच येऊन ठेपली आहे, असे डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचे कार्यकारी उपाध्यक्ष अजित मेनन यांनी मत व्यक्त केले. ‘‘गेल्या पाच-सहा वर्षांत समभाग बाजाराने फारसे काही गुंतवणूकदारांच्या पदरात पाडलेले नाही हे कबूल. परंतु आगामी काळ हा समभाग गुंतवणुकीच्या बहराचा निश्चितच असेल. सोने आणि स्थावर मालमत्ता यासारख्या गुंतवणुकीतून नजीकच्या काळात पूर्वीइतक्या परताव्याची शक्यताही कमी झाली असताना, गुंतवणूकदारांना आपली काही पुंजी या पर्यायाकडे वळवावीच लागेल आणि हीच बाब चांगल्या लाभाची हमी देणारीही ठरली आहे,’’ असे मेनन सांगतात.
भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान झालेले नजीकच्या काळात स्पष्टपणे दिसत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेही दरकपात करावी अशी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याने ही बाब अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी उपकारकच ठरेल. ज्याचा सर्वाधिक लाभ हा भांडवली बाजारालाच येत्या काळात होताना दिसेल, असे यूटीआय म्युच्युअल फंडाच्या ताज्या अहवालाचाही निष्कर्ष आहे.
शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या उंचीचा कयास बांधणे ही कोणाच्याच आवाक्यातील गोष्ट नाही. त्यामुळे कितीही अनुकूल स्थिती असली तरी शेअर्समधील गुंतवणूक ही सुनियोजित आणि सबुरीनेच व्हायला हवी, असा आयडीएफसीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्याधिकारी विक्रम लिमये यांचाही सामान्य गुंतवणूकदारांना सल्ला आहे. तब्बल ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूकयोग्य गंगाजळी असलेल्या आयडीएफसीच्या इक्विटी फंडांची कामगिरी ही इतरांपेक्षा गेल्या काही वर्षांत सरस ठरली आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा निरंतर ओघ सुरू असलेल्या मोजक्या फंड हाऊसेसपैकी आयडीएफसी एक आहे. लिमये यांच्या मते इक्विटीमध्ये गुंतवणूक हा आजच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असला तरी ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची किमान तीन ते पाच वर्षांसाठी असायला हवी आणि तीन ‘एसआयपी’च्या माध्यमातूनच केली जायला हवी, जेणे करून बाजारातील चढ-उतारांचा नेमका लाभ या गुंतवणुकीतून उठविता येईल. अशा गुंतवणुकीतून तीन वर्षांत निश्चितच दमदार परताव्याची अपेक्षा करता येईल.

म्युच्युअल फंडच का?
म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदार संख्या जैसे थे, तर गेल्या काही वर्षांत प्रत्यक्षात घटत जाणे ही बाब निश्चितच देशातील म्युच्युअल फंड उद्योगाला हादरा देणारी आहे. गुंतवणूकदारांमध्ये जाणीव-जागृती हाच यावरील तोडगा असल्याचे हेरून बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने विशेष अभियानाची आखणी केली आहे. http://www.janotohmano.com   हे संवादी संकेतस्थळही या उद्देशाने विकसित केले गेले आहे. म्युच्युअल फंडाच्या भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी त्यांनी गतकाळात केलेली परतावाविषयक कामगिरी ही जशी हमी नसते, तसेच गुंतवणूकदारांचा या पूर्वीचा वाईट अनुभव हा वर्तमानात म्युच्युअल फंडांकडे पाठ फिरविण्यासाठी कामी येऊ नये, हेही अभिप्रेत असल्याचे बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाच्या प्रवक्त्याने या अभियानाविषयी बोलताना स्पष्ट केले. म्युच्युअल फंड हाच सध्याच्या घडीला गुंतवणुकीचा उत्तम पर्याय कसा हे समजायचे आणि गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या गैरधारणा दूर व्हायचे तर प्रत्यक्षात म्युच्युअल फंड ही संकल्पना नेमकी काय आहे, हे जाणून घेऊनच ते घडू शकेल.

गुंतवणूकदार नव्हेत, केवळ बचतकर्ते?
भारतातील बचतीचा ३० टक्के दर हा निश्चितच उमदा आहे. अर्थात लोकांकडे खर्च करून शिल्लक उरणारी प्रचंड संपत्ती असल्याचे हे द्योतक आहे. परंतु बहुतांश भारतीय हे केवळ बचतकर्तेच आहेत, गुंतवणूकदार नव्हेत. गुंतवणूकदारांचा उमदा वर्ग विकसित झाला तरच तो अर्थव्यवस्थेसाठी दीर्घ मुदतीत भांडवलाचा स्रोत निर्माण करणारा ठरतो. गेल्या चार-पाच वर्षांत याचीच आपल्याकडे मोठी उणीव दिसून आली आहे. दीर्घ मुदतीत भांडवली बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच फलदायी ठरली असल्याची साक्ष इतिहासच देतो. पण त्याबाबत पुरेशी जागृतीच नसल्याने लोकांचा कल हा सोने, स्थावर मालमत्ता यासारख्या अर्थव्यवस्थेसाठी अनुत्पादकच नव्हे तर मारक गुंतवणुकीकडे वाढला आहे. ‘सेबी’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा परिणाम म्हणून आगामी काळात चित्र पालटण्याची शक्यता मात्र दिसून येत आहे. ‘सेबी’च्या दंडकाप्रमाणे एकूण गंगाजळीच्या दोन आधार बिंदू (अर्थात दोन शतांश टक्के) इतकी रक्कम म्युच्युअल फंडांना गुंतवणुकांच्या जनजागरणासाठी खर्च करावी लागणार आहे. सध्याच्या म्युच्युअल फंडांनी गोळा केलेल्या साधारण सात लाख कोटी रुपये इतक्या गंगाजळीच्या तुलनेत ही रक्कम दीडशे कोटींच्या घरात जाणारी होती. इतकी रक्कम दरसाल आम गुंतवणूकदारितेचा कल म्युच्युअल फंडांकडे वळविण्याच्या कामी वापरात आली तर चित्र बदलले जाणे स्वाभाविकच दिसते.
-अजित मेनन
कार्यकारी उपाध्यक्ष, डीएसपी ब्लॅकरॉक

गुंतवणुकीची विभागणी आवश्यक!
गुंतवणूक नियोजनात ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ हा आपल्याला उपलब्ध असलेला सुरक्षिततेचा सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणजे आपल्याकडील गुंतवणूकयोग्य रक्कम ही वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागली गेल्यास या गुंतवणुकीशी संलग्न जोखीम आपोआपच कमी होते आणि परिणामी अपेक्षित परताव्याची ती हमीही ठरते. त्यामुळे सोने-जमीन-घर हे गुंतवणुकीचे पर्याय आता आकर्षक राहिले नसताना, काही गुंतवणूक ही भांडवली बाजारांकडे वळविली जाणे काळाशी सुसंगत ठरेल. गुंतवणूक-भांडारात आजच्या घडीला म्युच्युअल फंडांच्या इक्विटी पर्यायांना स्थान देणे क्रमप्राप्तच ठरेल.
-विक्रम लिमये,
व्यवस्थापकीय संचालक आयडीएफसी लि.