वस्तुबाजार मंच नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.- एनएसईएलमधील सध्याचा घोटाळा हे दुसरे तिसरे काही नसून प्रवर्तक जिग्नेश शाह आणि अन्य संचालक व व्यवस्थापनाने आज कथित थकबाकीदार बनलेल्यांशी साटेलोटे करून पुढे आलेले कारस्थान असल्याचे सार्वजनिक मालकीच्या एमएमटीसी लिमिटेडने देशाचे अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एमएमटीसीसह या घोटाळ्यात पैसे फसलेल्या अन्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याही अ‍ॅटर्नी जनरल यांचे या संबंधाने कायदेशीर मत अजमावत आहेत.
एमएमटीसी ही एनएसईएलवरील उलाढाल करणारी प्रमुख कंपनी असून, घोटाळ्यापायी तिचे २२० कोटी रुपये येणे थकले आहे. अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांना दिलेल्या तक्रारीत कंपनीने म्हटले आहे की, एनएसईएलमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची जिग्नेश शहा आणि निलंबित करण्यात आलेले मुख्याधिकारी अंजनी सिन्हा यांना बिलकूल जाणीव नव्हती अशी कल्पनाही करता येत नाही. उलट सर्वाच्या संगनमताने झालेले हे कारस्थान असल्याचा स्पष्ट आरोप तिने केला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अंजनी सिन्हा आणि अन्य प्रमुख पदस्थ व्यक्तींची केलेली हकालपट्टी ही शुद्ध धूळफेक असल्याचे तिने म्हटले आहे. खुद्द जिग्नेश शाह यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन व त्यांच्यासह एनएसईएलचे संचालन करणारे मंडळच या सर्व कारस्थानाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा कंपनीने पुनरुच्चार केला आहे.
एनएसईएलच्या म्हणण्यानुसार, एकंदर २४ थकबाकीदारांनी या बाजारमंचाची ५५७२ कोटी रुपयांची देणी थकविली असून, परिणामी या रकमेची एमएमटीसीसारख्या कंपन्यांसह सुमारे १३,००० व्यक्तिगत गुंतवणूकदारांना परतफेड करणे मुश्किलीचे बनले आहे. एकूण थकीत रकमेपैकी केवळ १६० कोटी रुपये (३%) रक्कमच या २४ थकबाकीदारांकडून एनएसईएलला अद्यापपर्यंत वसूल करता आले आहेत.

पोलिसांकडून  ‘लूकआऊट नोटीस’
मुंबई: ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.’मधील ५६०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रवर्तक जिग्नेश शाह परदेशात निघून जाऊ नये यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शाह आणि अन्य आरोपींना पकडण्यासाठी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे. सोमवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जिग्नेश शाह, ‘एमसीएक्स’चे जोसेफ मॅसी, इतर संचालक मंडळी आणि थकबाकीदारांविरोधात फसवणूक, गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वाना चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश यापूर्वीच बजावण्यात आले आहेत. यानंतर आता जिग्नेश शाह आणि या इतर आरोपींसाठी ‘लूक आऊट’ नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी कोणीही परदेशी निघून जाऊ नये याची काळजी घेण्याची विनंती इमिग्रेशन विभागाला करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने देशभरातील १९० ठिकाणांवर छापे मारले आहेत. त्यात निवासस्थाने, कार्यालये आणि गोदामांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ६० गोदामांवरील छाप्यांमध्ये ३० गोदामे ही पूर्णपणे रिकामी आढळली. तर चार गोदामे ही कागदावरच होती, पण प्रत्यक्ष पत्त्यावर तशी इमारतच नव्हती, असेही उघडकीस आले आहे.