‘इंडियन र्मचट्स चेंबर’च्या महिला शाखेतर्फे देण्यात येणारा जानकीदेवी बजाज पुरस्कार ‘महिला हाथ’च्या सरचिटणीस कृष्णा बिश्त यांना नुकताच प्रदान करण्यात आला. नर्गिस दत्त मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त प्रिया दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महिला शाखेच्या अध्यक्षा आरती सांघी याही या वेळी उपस्थित होत्या. बिश्त यांनी ग्रामीण भागात गरिब महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यूटीआय फोकस्ड इक्विटी फंडात ९०० कोटींची गुंतवणूक
मुंबई: यूटीआय म्युच्युअल फंडाने दाखल केलेल्या ‘फोकस्ड इक्विटी फंड- सिरीज ।।’ने उत्तम प्रतिसाद मिळवीत, ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. १,१०२ दिवसांसाठी मुदत बंद असलेल्या या योजनेने इतकी मोठी गुंतवणूक मिळविणे खूपच उत्साहवर्धक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या फंडाची प्रारंभिक विक्री (एनएफओ) ४ ते १८ डिसेंबर २०१४ दरम्यान करण्यात आली होती. तब्बल ७६,००० अर्ज या फंड विक्रीसाठी दाखल झाले, तर सुमारे ६० टक्के गुंतवणूक ही बडय़ा १५ शहरांपल्याडच्या म्हणजे म्युच्युअल फंडांकडून दुर्लक्षित छोटी शहरे व निमशहरी भाग अर्थात ‘बी-१५’ ठिकाणांतून फंडाने मिळविणे हीदेखील अनोखी बाब असल्याचे यूटीआय म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांनी सांगितले.