मुंबई : राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीपुढे दिवाळखोरीसाठी प्रकरण दाखल झालेल्या जेट एअरवेजबाबत निर्णय घेण्यासाठी कंपनीला कर्ज देणाऱ्या व्यापारी बँकांची येत्या गुरुवारी बैठक होत आहे.

कंपनीत हिस्सा खरेदीकरिता स्वारस्य दाखविणाऱ्या नावांच्या निश्चितीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही बैठक होत आहे. बँकांना  या संबंधाने येत्या शनिवापर्यंत निर्णय घेणे बंधनकारक आहे.

विविध २६ हून अधिक व्यापारी बँकांचे ८,५०० कोटी रुपये कर्ज थकविणाऱ्या जेट एअरवेजची सेवा १७ एप्रिलपासून ठप्प आहे. कर्जतिढा सोडविण्यासाठी बँकांनी विधि न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. जेट एअरवेजच्या खरेदीकरिता प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.

एप्रिलअखेपर्यंत कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या १२४ वरून १४ वर आली. तसेच कंपनीवरील दायित्वाची रक्कमही ३६,००० कोटी रुपयांपुढे गेली आहे.

जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीसाठी न्यायाधिकरणात जाण्यापूर्वी झालेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. कंपनीतील सध्याची विदेशी भागीदार एतिहादसह टाटा समूहानेही नंतर माघार घेतली. दरम्यान, जेट एअरवेजचे संस्थापक-प्रवर्तक नरेश गोयल हे हिस्सा विकून बाहेर पडले. त्यानंतर हे प्रकरण १७ जूनमध्ये न्यायाधिकरणात गेले.

या प्रकरणी व्यावसायिक म्हणून आशीष छावछारिया यांच्या नियुक्तीला परवानगी देतानाच न्यायाधिकरणाने हिस्सा विक्रीची प्रक्रिया १९ जुलैपर्यंत सुरू करण्यासही सांगितले.