News Flash

मुकेश अंबानी अव्वलच; गौतम अदानींची संपत्ती दुप्पट

अब्जाधीशांच्या यादीत ४० भारतीयांचा समावेश

(संग्रहित छायाचित्र)

करोना-टाळेबंदीने सामान्यांसह देशाचे अर्थकंबरडे मोडले असतानाच वर्ष २०२० मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ४० नव्या उद्योगपतींची भर पडली आहे. एकूण १७७ जणांच्या याबाबतच्या यादीत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे नेहमीप्रमाणे भारतीय अब्जाधीश म्हणून अव्वल राहिले आहेत, तर अदानी समूहाचे चर्चेतील गौतम अदानी यांची संपत्ती या दरम्यान दुप्पट झाली आहे.

प्रसिद्ध हरून या संस्थेने केलेल्या जागतिक श्रीमंतांच्या यादी सर्वेक्षणात १७७ अब्जाधीशांचा समावेश आहे. यामध्ये ऐन करोना-टाळेबंदीच्या वर्षांत ४० अब्जाधीशांचा नव्याने समावेश झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतीय अब्जाधीशांच्या यादीत ८३ अब्ज डॉलरसह क्रमांक एकवर आहेत. यंदा त्यांची संपत्ती वार्षिक तुलनेत २४ टक्क्यांनी वाढली आहे. तर जागतिक क्रमवारीत संपत्ती संचयनाबाबत त्यांचे स्थान आठव्या स्थानावर आहे.

अंबानी यांच्या पाठोपाठ अदानी समूहाचे गौतम अदानी यांचे नाव आहे. त्यांचे स्थान यंदा थेट २०ने उंचावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ४८वे अब्जाधीश असणाऱ्या अदानी यांची संपत्ती यंदा ३२ अब्ज डॉलर झाली असून वार्षिक तुलनेत ती दुप्पट झाली आहे. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी झेपावत ९.८ अब्ज डॉलर झाली आहे.

भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर असून त्यांची संपत्ती २७ अब्ज डॉलर आहे. महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांची संपत्ती थेट १०० टक्क्यांनी वाढून ती २.४ अब्ज डॉलर झाली आहे.

पतंजलिच्या बालकृष्णन यांच्या संपत्तीत घसरण

पतंजलि आयुर्वेदचे मुख्याधिकारी आचार्य बालकृष्णन यांच्या संपत्तीत यंदा ३२ टक्के घसरण झाली असून ती ३.६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. १७७ अब्जाधीशांच्या यादीत सर्वाधिक, ६० मुंबईतील उद्योगपती आहेत. तर महिलांमध्ये बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ (४१ टक्के वाढ) या अव्वल आहेत. शेजारच्या चीनचे सर्वाधिक अब्जाधीश यादीत आले आहेत. तर जागतिक स्तरावर टेस्लाचे एलन मस्क (१९७ अब्ज डॉलर), अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस (१८९ अब्ज डॉलर) हे अव्वल अब्जाधीश आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:35 am

Web Title: list of billionaires includes 40 indians abn 97
Next Stories
1 बँकांचा कर्जहात आखडता!
2 फेब्रुवारीत निर्यातीमध्ये घसरण; व्यापार तूट विस्तारली
3 रिलायन्स जिओ सर्वात मोठा परवाना खरेदीदार
Just Now!
X