करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधात शिथिलतेमुळे देशाचे उद्योगजीवन सामान्य होत असल्याचे प्रतिबिंब हे देशाच्या निर्मिती क्षेत्राच्या मागणी आणि उत्पादन कामगिरीतही पडले आहे. एका खासगी सर्वेक्षणाच्या निष्कर्षांने याची ठोसपणे पुष्टी बुधवारी केली.

सप्टेंबरमध्ये भारताच्या निर्मिती क्षेत्राच्या उत्पादन आणि मागणीने गत आठ वर्षांतील सर्वोच्च वृद्धीदर राखला आहे. ‘आयएचएस मार्केट’ या संस्थेने निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जाणून संकलित केलेला ‘निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ अर्थात पीएमआय निर्देशांकाने ऑगस्टमधील ५२ अंशांच्या स्तरावरून सप्टेंबर महिन्यांत ५६.८ अंशावर पोहोचला आहे. जानेवारी २०१२ नंतर या निर्देशांकाची ही सर्वोत्तम झेप आहे.

विशेष म्हणजे ऑगस्टनंतर, सलग दुसऱ्या महिन्यांत या निर्देशांकाची कामगिरी उत्पादन क्षेत्रात दमदार सक्रियता दर्शविणारी आहे. याचा अर्थ, एप्रिलपासून कडकपणे लागू केल्यामुळे ठप्प पडलेल्या उद्योगांमध्ये आता उत्पादनासाठी यंत्रे पुन्हा वेगाने धडधडू लागली आहेत. देशाचे सेवा क्षेत्रही मरगळ झटकून ऑगस्ट महिन्यात लक्षणीय स्वरूपात सक्रिय झाल्याचे या मासिक सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

‘आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या कारखान्यातील उत्पादनाची क्षमता योग्य दिशेने वाढत असून, सप्टेंबरमध्ये ‘पीएमआय निर्देशांकां’च्या आकडेवारीत अनेकांगाने सकारात्मकता दिसून आली आहे. सहा महिन्यांच्या शिथिलतेनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे हे निश्चितच सुचिन्ह आहे,’ असे आयएचएस मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलीयाना डीलीमा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

..पण किंमतवाढ आणि कर्मचारी कपातही!

सप्टेंबरमध्ये कच्च्या मालाच्या किमती नाममात्र वाढल्या, तरी आधीचा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी उत्पादनाच्या किमतीही वाढविल्या आहेत. उत्पादन क्षमतेत लक्षणीय सुधारणा असूनही कंपन्यांनी सलग सहाव्या महिन्यात कर्मचारी कपात केल्याचे आयएचएस मार्केटच्या अहवालाने नमूद केले आहे. स्थापित क्षमतेच्या किती तरी कमी प्रमाणात उत्पादन होत असल्याचा विपरीत परिणाम या क्षेत्रातील रोजगारावर झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मागील काही पतधोरणातून सातत्याने व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि सातत्याने वाढत्या महागाई दरामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदर कपात खंडित करावी लागली.