पत गुणवत्तेतील सुधाराचा लाभ

मुंबई : राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) एप्रिल-जून २०२१ तिमाहीत नफ्यात दुप्पट वाढीची नोंद केली आहे. पत गुणवत्तेतील सुधार आणि व्याजापोटी उत्पन्नात वाढीच्या जोरावर बँकेने ही कामगिरी केली आहे.

महाबँकेने चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत २०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत बँकेचा करोत्तर नफा १०१ कोटी रुपये होता.

गेल्या तिमाहीत बँकेला निव्वळ व्याजातून होणारे उत्पन्न वार्षिक तुलनेत २९ टक्क्यांनी वाढून १,४०६ कोटी रुपये झाले आहे. वर्षभरापूर्वी ते १,०८८ कोटी रुपये होते. बँकेच्या निव्वळ व्याजाच्या लाभाचे प्रमाण यापुढेही ३ टक्क्यांवर असेल, असे मुख्याधिकारी राजीव यांनी सांगितले.

बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाणात यंदा १०.९३ टक्क्यांवरून ६.३५ टक्क्यांपर्यंतचा सुधारणा झाली आहे. तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ४.१० टक्क्यांवरून निम्म्यावर, २.२२ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. हे दोन्ही प्रमाण वित्त वर्षअखेपर्यंत अनुक्रमे ६ व २ टक्क्यांखाली असेल, असा विश्वास राजीव यांनी व्यक्त केला.

बँकेच्या कर्जाचे प्रमाण १४ टक्क्यांनी विस्तारले आहे, तर ठेवीदेखील याच प्रमाणात वाढल्या आहेत. बँकेच्या किरकोळ, कृषी तसेच लघुउद्योग क्षेत्रासाठीच्या व्यवसायात १६ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षांत कर्ज वितरणातील वाढ १४ ते १५ टक्के राहण्याबाबतचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या अधिग्रहणाबाबत वेदांता समूहाच्या ट्विन स्टार टेक्नॉलॉजिज्च्या मंजूर प्रस्तावाविरोधात राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरण लवादात जाण्यामागे अत्यल्प मूल्याची बोली हेच कारण असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्जविषयक तोडग्याच्या आराखडय़ांतर्गत बँकेने जून २०२१ अखेर १,४८७ कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना केली असून त्यात तिमाहीत आणखी ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांची भर पडेल, असा अंदाज मुख्याधिकारी राजीव यांनी व्यक्त केला.

करोना वैश्विक साथीच्या कालावधीतही बँकेने सर्व आर्थिक बाबींवर यंदा उत्साहवर्धक कामगिरी केली आहे. बँकेचे हे यश आगामी कालावधीतही कायम असेल.

’  ए. एस. राजीव, मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र