वाहन क्षेत्रातील अस्थिरतेतून सावरण्यासाठी येत्या कालावधीत आणखी नव्या वाहनांची कास धरण्यात येईल, असा शब्द महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी शुक्रवारी भागधारकांना दिला. समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना महिंद्र यांनी वर्षांच्या उत्तरार्धापासून समूहाला व्यवसाय वाढीची आशा असल्याचे नमूद केले.
स्पोर्ट तसेच कृषिपयोगी वाहन बाजारपेठेत वरचष्मा असलेल्या महिंद्र समूहाने गेल्या काही कालावधीत घसरत्या वाहन विक्रीचा सामना केला आहे. याचा धागा पकडत आनंद यांनी केवळ महिंद्रच नव्हे तर या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनाही मंदीचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले.
चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत नफ्यातील ३.३५ टक्के घसरण नोंदविणारे वित्तीय निष्कर्ष महिंद्र समूहाने शुक्रवारी जाहीर केले. कंपनीची विक्रीही याच प्रमाणात रोडावली आहे. कंपनीला घसरत्या ट्रॅक्टर विक्रीचा मोठा फटका बसला असून समूह आघाडीवर असलेल्या बहुपयोगी वाहनांची विक्रीही पहिल्या तिमाहीत ०.६ टक्क्य़ांनी घसरली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत समूहाच्या वाहन विक्री व्यवसायाने विक्रीतील १० टक्के घट नोंदविली आहे; तर ट्रॅक्टरपासून मिळणारा लाभही ३० टक्क्य़ांनी रोडावला आहे. ही स्थिती २००९च्या तिसऱ्या तिमाहीप्रमाणे असल्याचे स्पष्ट करत महिंद्र यांनी या कालावधीत कंपनीने केवळ एक कोटी रुपयांचा नफा कमाविल्याचे भागधारकांसमोर सांगितले. समूहाच्या ट्रॅक्टर विक्रीने गेल्या दशकातील सर्वात मोठी घट नोंदविल्याचे नमूद करत यंदाचा मान्सून चांगला राहिल्यास कृषीविषयक वाहनांची मागणी आगामी कालावधीत वाढेल, असा विश्वासही महिंद्र यांनी यावेळी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित सहा महिन्यांत कंपनी नवी वाहने सादर करणार असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या जोरावर समूहाची कामगिरी पुन्हा उंचावेल, असेही ते म्हणाले.