गुजरातमधील कापड व्यावसायिकांच्या आंदोलनाने कापड विक्रीविना पडून

शाहिदा रफिक शेख यांनी शुक्रवारचा दिवस भरला आणि काम संपत आले तेव्हा त्यांच्यासह १४९ कामगारांना त्यांचे मालक फय्याझ अहमद यांनी सोमवारपासून कामावर येऊ नका असे सांगितले. त्या काम करत असलेल्या एफटी टेक्स्टाइल्स प्रा. लि. सारखी भिवंडीतील संपूर्ण यंत्रमाग उद्योगापुढे ठप्प पडण्याचे संकट उभे ठाकले आहे.

एफटी टेक्स्टाइल्सचे मालक अहमद यांचे या भागात ५००० यंत्रमाग आहेत. त्यांच्या व्यथा वेगळ्याच आहेत. ‘माझ्या गोदामात १० लाख मीटर कापड पडून आहे. आता माझ्याकडे कापड ठेवायला जागा नाही. वस्तू-सेवाकराविरोधात आंदोलन सुरू झाल्याने बाजारात सूत मिळत नाही. मला नाइलाजाने काम बंद करावे लागत आहे,’ असे अहमद यांनी सांगितले.

४२ वर्षीय शाहिदा यांच्या कुटुंबात सहा जण असून घरातील त्या एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. आता त्यांच्यासमोर कुटुंबाचा खर्च चालवण्याची विवंचना आहे. या कंपनीत वरिष्ठ टेस्टर आणि मेंडर पदावर गेली सात वर्षे त्या काम करत आहेत.  महिन्याला १४,००० रुपये कमावतात. पण आता नोकरी गेल्याने त्यांना मुलांच्या शिक्षणाचा आणि आजारी पतीच्या औषधपाण्याचा खर्च कसा भागवायचा याची चिंता आहे. भारतातील कापड उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या भिवंडीतील लाखो यंत्रमाग कामगारांची अशीच व्यथा आहे. वस्तू-सेवाकराच्या अंमलबजावणीमुळे या क्षेत्रातील विणकर, कामगार, तंत्रज्ञ, रोजंदारीवरील कामगार यांच्या जीवनाची वीणच उसवून टाकली आहे. ज्या कापड उद्योगाला करात नेहमीच सवलती मिळत होत्या त्यावर आता नव्या कर यंत्रणेत कुऱ्हाड कोसळली आहे.

कापडावर लावण्यात आलेल्या पाच टक्के वस्तू-सेवाकराविरोधात कापड व्यावसायिक निषेध नोंदवत आहेत. करामुळे कोणी कापड विकत घेण्यास तयार नाही. न विकलेल्या कापडाचा साठा वाढत चालल्याने विणकरांनी उत्पादन थांबवले आहे. गेल्या २० दिवसांत भिवंडीतील पाच लाख यंत्रमाग बंद पडले असल्याचे मालकांनी सांगितले. गुजरातमधील कापड व्यावसायिकांचे आंदोलन जसे अधिक तीव्र होईल तसे आणखी माग बंद पडतील असे त्यांनी सांगितले. एकीकडे वस्तू-सेवाकराने मध्यस्थ दूर जातील, असे सांगितले जाते. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. पण दुसरीकडे आमच्या उत्पादनाची किंमत वाढत जाईल, असे अहमद यांनी म्हटले.

दरम्यान, एफटी टेक्स्टाइल्समध्ये वरिष्ठ टेस्टर म्हणून काम करणाऱ्या राणी पांडे यांनी सांगितले की,‘ मी आणि माझे पती मिळून महिन्याला २२,००० रुपये कमावतो. त्यापैकी बरेचसे आमच्या तीन मुलांच्या शिक्षणावर खर्च होतात. आमच्याकडे काहीही बचत नाही.’

भिवंडीत विणकर, तंत्रज्ञ, कामगार यांत बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओदिशातून आलेल्या नागरिकांचा मोठा भरणा आहे. यंत्रमाग बंद पडल्याने त्यांचे पुन्हा स्थलांतर होत आहे. कामगार शक्यतो काही ठरावीक रक्कम कमावण्याचे उद्दिष्ट घेऊन येतात. त्यांना येताना घेतलेले कर्ज फेडायचे असते किंवा मुलीच्या लग्नासाठी पैशाची सोय करायची असते. पण आता काम नसल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. त्यांना थांबवण्यासाठी आम्हाला त्यांना दिवसाकाठी सरासरी २०० रुपये द्यावे लागत आहेत. जेव्हा काम परत सुरू होईल तेव्हा एकदम मोठय़ा प्रमाणात कामगार जमवणे अवघड होईल, असे शहाबुद्दीन शेखया कंत्राटदाराने सांगितले. या सर्व गोंधळात शाहिदा आशा करतात की यंत्रमाग व्यवसाय या परिस्थितीतून तरेल. त्या म्हणाल्या की, यंत्रमाग सुरू राहिले पाहिजेत. नाहीतर आम्हाला काही तरणोपाय राहणार नाही.

नव्या करप्रणालीत विणकरांना सूत खरेदी करताना कापसाच्या सुतावर पाच टक्के आणि कृत्रिम धाग्यांच्या सुतावर १८ टक्के कर भरावा लागतो. याशिवाय पाच टक्के सेवा कर द्यावा लागत आहे. आम्ही यंत्रमागात लागणाऱ्या १० सेवांसाठी पाच टक्के दराने कर भरला तर आमची उत्पादन किंमत १५ टक्क्यांनी वाढेल. आमच्या उत्पादनावर लावण्यात येणाऱ्या करातून ती भरून निघणार नाही आणि आम्हाला अधिक भरुदड सोसावा लागेल.  रुपेश अगरवाल, भिवंडीतील यंत्रमाग मालक