स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांच्या लढय़ाला नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील माथाडी कामगार युनियनने बुधवारी पाठिंबा दर्शविला. मुंबईतील सर्व घाऊक बाजारपेठांमधील व्यापारी आणि काही ठिकाणी किरकोळ दुकानदारही आजपासून सुरू झालेल्या बेमुदत बंदमध्ये सहभागी झाल्याचा या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या ‘फॅम’ने दावा केला.
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांच्या लढय़ाला आणखी धार आणण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र- फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी आणि अन्य ११ पदाधिकारी हे आझाद मैदानावर गुरुवारपासून प्राणांतिक उपोषणाला बसतील आणि गटागटाने व्यापारी संपूर्ण मुंबईभर छोटे-मोठे किरकोळ विक्रेते आणि सामान्य ग्राहकांमध्ये या नव्या कर-प्रस्तावाविरोधात जनजागरणाची मोहिम चालवतील, असे मुंबईत झालेल्या विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत सहभागी होत नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या माथाडी कामगार युनियनचा पाठिंबा दर्शविला. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १ ऑक्टोबर २०१३ पासून व्यापाऱ्यांसाठी हा जकात पर्यायी नवीन कर लागू होणार आहे. राज्यात अन्य पालिका क्षेत्रात तो अंमलात आला आहे.