मुंबई : देशातील प्रस्थापित बँकांकडून कर्ज उचल ही कैक दशकांच्या नीचांक स्तरावर असताना, सूक्ष्म वित्त कंपन्यांकडील कर्ज वितरण डिसेंबर २०१८ अखेर समाप्त तिमाहीत मात्र दमदार ४३.१ टक्क्य़ांनी वाढून १.६६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. डिसेंबर २०१७ अखेर या उद्योगातून वितरित कर्जाचे प्रमाण १.१६ लाख कोटी रुपये असे होते.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या तिमाहीत देशात सध्या कार्यरत विविध ५० सूक्ष्म वित्त कंपन्यांकडून एकत्रितपणे १९,९१९ कोटी रुपयांची कर्जे नव्याने वितरित करण्यात आली. सुमारे ७७ लाख खातेदारांना या कर्जसुविधेचा लाभ मिळाला, अशी माहिती ‘मायक्रोफायनान्स इन्स्टिटय़ूशन नेटवर्क (एमएफआयएन)’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने पुढे आणली आहे. आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या म्हणजे डिसेंबर तिमाहीत देशातील या कंपन्यांच्या एकूण कर्जदार खातेदारांची संख्या ८.९१ कोटींवर पोहचली असून, आधीच्या (दुसऱ्या) तिमाहीच्या तुलनेत त्यात २४.३ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

दमदार वाढीसह एकूण पतविषयक गुणवत्ता या उद्योग क्षेत्राने राखली आहे, एमएफआयएनचे मुख्य कार्यकारी हर्ष श्रीवास्तव यांनी सांगितले. गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांशी संलग्न सूक्ष्म-वित्त कंपन्यांचा या क्षेत्रात मोठा वाटा असून, वर्षभरापूर्वीच्या रोकड तरलतेच्या अभावाच्या समस्येतून त्यांनी डोके वर काढले असून, त्यांच्या कर्ज वितरणात वाढीसह खातेदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. एकूण सूक्ष्म वित्त क्षेत्रात त्यांचाच वाटा ३६.५ टक्के असून, बँकांशी संलग्न सूक्ष्म-वित्तसहाय्य हे जरी वार्षिक तुलनेत ५० टक्के वाढले असले तरी ५३,६०५ कोटी रुपये (३२.२ टक्के वाटा) इतके आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. नव्याने सुरू झालेल्या स्मॉल फायनान्स बँकांचा वाटा १८.२ टक्के इतका असून, त्यांचे कर्ज वितरण ३०,१८७ कोटींच्या घरात आहे.

‘एमएफआयएन’ ही रिझव्‍‌र्ह बँकेची मान्यता असलेली सूक्ष्म-वित्त क्षेत्रासाठी स्थापित उद्योग महासंघ आणि स्वयं-नियमन संस्था आहे.