‘मूडीज्’कडून विकासदराबाबत अंदाजात सुधारणा * ताजे संकेत खूपच आश्वासक – अर्थमंत्री

नवी दिल्ली : दीर्घ काळ आणि कडकडीत राहिलेल्या टाळेबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत तुलनेने गतिमानतेने पुनर्उभारी सुरू असून, जागतिक पतमानांकन संस्था ‘मूडीज्’ने त्याची दखल घेत, कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज आधीच्या उणे ९.६ टक्क्य़ांवरून सुधारून, आता तो उणे ८.६ टक्के राहिल असे स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मूडीजच्या या सुधारीत अंदाजाचा दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना दाखला दिला.

मूडीजने आगामी कॅलेंडर वर्ष २०२१ भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा अंदाजही सुधारून घेत, त्या आकडय़ातही वाढ केली आहे. आर्थिक विकास दर आगामी वर्षांत ८.१ टक्के नव्हे तर ८.६ टक्के असा गतिमान असेल, असा तिचा कयास आहे. २०१९ सालात भारताने ४.८ टक्क्य़ांचा विकास दर नोंदविला आहे.

्नराष्ट्रीय स्वरूपाची ६९ दिवसांची टाळेबंदी, तर त्यानंतर अनेक राज्यांमध्ये प्रदेश स्वरूपाचे निर्बंध साथीच्या काळात भारतात सुरू राहिले. हे निर्बंध जसे टप्प्याटप्प्याने हळूवार शिथिल होत आहेत, त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत उभारीही ही तूटक स्वरूपात सुरू असल्याचे मूडीज इन्व्हेस्टर्स सव्‍‌र्हिसेसने अहवालात म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेतील उसळीचे ताजे संकेत खूपच आश्वासक असून, ते तात्पुरते नव्हेत शाश्वत स्वरूपाचे आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अर्थप्रोत्साहनाच्या तिसऱ्या टप्प्याची गुरुवारी दुपारी घोषणा करताना प्रास्ताविकात म्हटले.

विजेच्या मागणीत वाढ, वस्तू व सेवा कराचे १.०५ लाख कोटींचे ऑक्टोबरमधील संकलन, रेल्वेने मालवाहतुकीच्या दैनंदिन प्रमाणातील वाढ, बँकांच्या पतपुरवठय़ात वाढ, त्याचप्रमाणे थेट विदेशी गुंतवणूक आणि परकीय चलन गंगाजळीची विक्रमी पातळी हे सर्व घटक अर्थचक्र वेगाने फिरू लागल्याचे दर्शवितात असे अर्थमंत्री म्हणाल्या. मूडीज्ने देशाच्या विकासदराच्या अंदाजात केलेल्या सुधारणा दमदार अर्थउभारीचेच द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले.