तब्बल १४१ वर्षांपासून सेवेत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टने सरलेल्या २०१४-१५ वर्षांत आजवरची सर्वाधिक ६१.६६ दशलक्ष मेट्रिक टनाचा व्यापार हाताळणारी विक्रमी कामगिरी केली आहे. भारतातील प्रमुख बंदराच्या तुलनेत ही चौथ्या क्रमांकाची कामगिरी करून मुंबई पोर्ट ट्रस्टने देशाच्या परराष्ट्र व्यापारात योगदानाचे आपले स्थान कायम राखले आहे. वर्षभरात बंदरातून झालेल्या वाहतुकीत आधीच्या वर्षांच्या तुलनेत २८ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. बंदरातून झालेली वाहनांची निर्यात ४२ टक्क्यांनी, तर लोह आणि पोलाद आयात ६२ टक्क्यांनी वधारली आहे, शिवाय सागरी पर्यटन जहाजांची (क्रूझ लाइनर) मुंबई बंदरातून रहदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या कामी सर्वाधिक योगदान देणाऱ्या १६ प्रमुख ग्राहकांबाबत कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, ओएनजीसी, आरसीएफ यासारख्या अग्रेसर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, तसेच फोक्सव्ॉगन, मारुती सुझुकी, टाटा पॉवर, जिंदाल स्टील, उत्तम गॅल्व्हा आणि काही शिपिंग एजंट्सचा सत्कार करण्यात आला.