समभाग तारण ठेऊन पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज

मुंबई : कर्जदात्या बँकांकडून सुरू झालेल्या कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रियेत भाग घेऊन अतिरिक्त मक्तेदारी मिळविण्यासाठी जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी गुरुवारी एक पाऊल पुढे टाकले. जेट एअरवेजमधील २६ टक्के समभाग हिस्सा तारण ठेवत गोयल यांनी याकरिता पंजाब नॅशनल बँकेकडून कर्जही मिळविले आहे.

गेली २५ वर्षे जेट एअरवेजचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर नरेश गोयल, पत्नी अनिता गोयल यांच्यासह कंपनीच्या संचालक मंडळावरून पायउतार झाले. ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजवर आता सर्वाधिक हिश्शासह स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. मात्र बँक कंपनीतील हिस्सा विक्रीकरिता स्वारस्य अजमावत आहे.

जेट एअरवेजमधील ३१ ते ७५ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकण्यात येणार असून, त्या संबंधाने स्वारस्य दाखविणाऱ्या निविदा मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जेटचे गोयल यांनीही या प्रक्रियेत आपले स्वारस्य दाखविले असून, त्यासाठी आवश्यक निधीकरिता पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज मिळविले आहे. जेटमधील आपल्या हिश्शातील समभाग तारण ठेवून रक्कम उभारली गेल्याचे गुरुवारी भांडवली बाजाराला कळविण्यात आले.

गोयल यांनी तारण ठेवलेल्या जेट एअरवेजच्या २.९५ कोटी समभागाचे मूल्य हे  गुरुवारी समभागाच्या २६४.६५ रुपये किमतीनुसार ७८०.७१ कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. जेट एअरवेजच्या हिस्सा विक्री प्रक्रियेला मंगळवारी मुदत संपल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने बोलीस्वारस्य प्रक्रिया आणखी दोन दिवस लांबविण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रश्नचिन्ह

ताफ्यातील एकूण विमानांची संख्या विहित मर्यादेपेक्षा कमी झाल्याने जेट एअरवेजच्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी कोणताही नागरी हवाई वाहतूक कंपनीला देशांतर्गत २० विमाने बंधनकारक आहेत. मात्र जेट एअरवेजच्या ताफ्यातील विमानांची संख्या सध्या १४ वर आली असून, तिच्या आंतरराष्ट्रीय उड्डाण पात्रतेबाबत ‘डीजीसीए’च्या अहवालाची प्रतीक्षा आहे.