गुंतवणूकदारांचा ढळलेला आत्मविश्वास आणि टाटांची नाममुद्रा पुनस्र्थापित करण्यासाठी सर्वोत्तम निवड

गेल्या काही महिन्यांतील खळबळीनंतर, देशातील सर्वात जुन्या उद्योग साम्राज्याला एकत्र बांधून ठेवून नव्या उंचीवर नेण्यासाठी टाटा सन्सने अध्यक्षपदासाठी नटराजन चंद्रशेखरन यांच्या नावाला दिली गेलेली पसंती अनेकांगाने अजोड आहे. यशस्वी व्यवसाय प्रणेता म्हणून प्रतिष्ठित असलेल्या चंद्रशेखर यांची निवड ही कैक वर्षे टाटा समूहाच्या मूल्यसंस्कृती व परंपरेशी घनिष्ठता असलेला अंतस्थ या नात्यानेही झाली आहे.

नजीकच्या वर्तुळात ‘चंद्रा’ म्हणून लोकप्रिय असलेले एन. चंद्रशेखरन हे टाटा समूहातील सर्वाधिक नफा कमावणारी ध्वजाधारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) या कंपनीची २००९ सालापासून धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ५३ वर्षीय चंद्रशेखरन यांची  १९८७ सालापासून म्हणजे तब्बल ३० वर्षांची त्यांची टाटा समूहात कारकीर्द राहिली आहे. तथापि टाटा समूहाचे नियंत्रण हाती असलेल्या टाटा सन्सचे संचालक म्हणून त्यांची निवड अलीकडेच २५ ऑक्टोबर २०१६ रोजी, सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर दुसऱ्याच दिवशी झाली.

चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली टीसीएसच्या महसुली आलेख २०१० सालातील ३०,००० कोटी रुपयांवरून, २०१६ सालात १.०९ लाख रुपयांवर निरंतर वाढत आला आहे. गुरुवारी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब आणि डिसेंबर २०१६ अखेर तिसऱ्या तिमाहीसाठी टीसीएसने अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांची केलेली नोंद हा सुंदर योगायोगही जुळून आला आहे. टीसीएसने या तिमाहीत ६,७७८ कोटींचा निव्वळ नफा कमावला, जो गत वर्षांतील याच काळातील कामगिरीच्या तुलनेत १०.९ टक्क्यांनी अधिक आहे.

जीई, जेपी मॉर्गन, वॉल मार्ट, क्वान्टास, सिस्को आणि व्होडाफोन असा टीसीएसने तगडा आंतरराष्ट्रीय ग्राहक वर्ग मिळविण्यात चंद्रशेखरन यांचे कर्तृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. किंबहुना त्यांच्याइतकी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अनुभव असलेली टाटा समूहात दुसरी व्यक्ती सध्या नाही.

तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेल्या चंद्रशेखर यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने टाटा समूहाला आवश्यक असलेला आधुनिक डिजिटल तोंडावळा त्यांच्याकडून दिला जाईल, अशीही अपेक्षा केली जात आहे. अनेक प्रसंगी प्रस्थापित घडी मोडून टाकणारा विध्वंस अनेकांगाने फलदायी ठरतो. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाचे वर्णन असेच जोखीम स्वीकारून धडाकेबाज व्यवसाय निर्णयांना पुढे दामटणारे आहे. अधिक प्रवाही आणि सुटसुटीत कामगिरीसाठी त्यांनी टीसीएसचे विविध २३ उपांगात केलेले विभाजन प्रारंभी अतिरेकी भासले. परंतु यातूनच टीसीएसने इन्फोसिसला पिछाडीवर टाकून अग्रस्थान पटकावले आणि प्रसंगी इन्फोसिससह अन्य कंपन्यांनाही या व्यूहनीतीचे अनुकरण करणे भाग ठरले.

टाटांच्या प्रतिष्ठेला मध्यंतरी आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीतून लागलेला बट्टा, गुंतवणूकदारांचा ढळलेला आत्मविश्वास या पाश्र्वभूमीवर अधिक विलंब न करता चंद्रशेखर यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही देशातील एक विश्वासपात्र उद्योगसमूह म्हणून टाटांच्या नाममुद्रेला पुन:स्थापित करण्याचा मोलाचा हातभार लावेल, असा विश्वास गुंतवणूकदार समूहातही व्यक्त होत आहे.