मुंबई : भूल घालणारे तगडे रूप आणि अभिजात दर्जा लाभलेली ‘जावा’ ही दुचाकीची नाममुद्रा तोच जुना रोमांच, परंतु नवीन साज-सामान आणि वैशिष्टय़ांसह मुंबईत नव्याने गुरुवारी सादर झाली.

‘‘एखादी आख्यायिका पुनर्जीवित होत असल्याचे पाहणे खरे तर दुर्मीळच आणि त्यात एक भागीदार असण्याची संधी भाग्याचीच.. अस्सल आणि अभिजात ब्रॅण्ड जावाचा हा असा पुनर्जन्म उत्सुकता चेतविणाराच आहे,’’ अशा शब्दांत महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी जावाच्या अनावरणप्रसंगी काढले. कधी काळी भारतात गतकाळात वैभवप्राप्त जावा येझ्डी दुचाकी विक्रीचा परवानाप्राप्त महिंद्रने नव्या रूपातील जावा नाममुद्रेचा परवाना मिळवून, तिची भारतात संयुक्तपणे निर्मिती आणि विक्रीचे हक्कही मिळविले आहेत.

क्लासिक लीजन्ड्स प्रा. लि. या तरुण नवउद्यमी उपक्रमाने नव्या पिढीसाठी या मोटारसायकलच्या पुनर्जन्माची संकल्पना पुढे आणली आणि त्यानेच ती विकसित करून जावा आणि जावा फोर्टी टू अशा दोन रूपांत गुरुवारी मुंबईत सादर केली. सिंगल सिलिंडर, डीओएचसी इंजिन डबल क्रेडल चॅसिसने आणि त्याच दमदार ‘फटफटी’च्या अद्वितीय आवाजाने युक्त नवीन जावासाठी १,६४,००० रुपये, तर जावा फोर्टी टूसाठी १,५५,००० रुपये किमतीने ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे.

या अनावरणप्रसंगी क्लासिक लीजंड नवउद्यमी उपक्रमाचे युवा संस्थापक अनुपम थरेजा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष जोशी, रुस्तमजी समूहाचे अध्यक्ष बोमन इराणी आणि आनंद महिंद्र उपस्थित होते.