सध्याच्या स्मार्टफोन्सच्या भाऊगर्दीत सर्वात किफायती दरात म्हणजे ‘आशा ५०१’ हा टचस्क्रीन फोन नोकियाने ५,३५० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. फिनलंडस्थित नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन एलोप यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पूर्णत: भारतात तयार केलेला हा स्मार्टफोन सादर केला. भारतात सर्वाधिक मोबाइल हँडसेट्स विकणारी कंपनी असलेल्या नोकियाने भारतातून हँडसेट्स निर्मिती सुरू करीत तळच्या खरेदीदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘आशा’ या उपनामाचीच निवड या स्मार्टफोनसाठीही केली आहे. नव्या आशाची निर्मिती चेन्नई येथील प्रकल्पातून करण्याबरोबरच विविध ९० देशांमध्ये तो येत्या जूनपासून निर्यातही होईल. नोकियाची कट्टर स्पर्धक असलेल्या सॅमसंग या कोरियन कंपनीनेही भारतातून मोबाइलनिर्मिती करण्याची घोषणा केली आहे. नोकियाने जानेवारी ते मार्च २०१३ यादरम्यान १.१ कोटी स्मार्टफोन विकले आहेत. यामध्ये आशाचा हिस्सा ५० लाख, तर ल्युमियाचे प्रमाण ५६ लाख आहे.

गुगलच्या अ‍ॅन्ड्रॉइड तंत्रज्ञानावर आधारित ‘आशा ५०१’द्वारे फेसबुकवर कोणत्याही शुल्काविना जाता येते. यासाठी भारती एअरटेल या दूरसंचार सेवा प्रदात्या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले आहे. दुहेरी सिमकार्डची सुविधा असणाऱ्या या मोबाइलमध्ये ३.२ मेगापिक्सल कॅमेरा आहे.