भांडवली बाजाराने शुक्रवारच्या व्यवहारांची सकारात्मक अखेर करून सलग पाच दिवसांच्या घसरणीला विराम दिला, तर चांगल्या तिमाही निकालांच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांचे समभागही ३ ते ७ टक्क्यांनी उसळताना दिसले. रिझव्‍‌र्ह बँकेनेही वाढत्या अनुत्पादित कर्जाच्या (एनपीए) समस्येशी झुंजताना वाणिज्य बँकांना दिलेला दिलासा या समभागांसाठी गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढविणारा ठरला.
शुक्रवारी डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने निव्वळ नफ्यात १५.३९ टक्क्य़ांची वाढ दर्शवून तो ३४८.९४ कोटींवर नेला. बँकेचे एकूण उत्पन्नही मागील वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत १८.२६ टक्क्यांनी वाढून ८,२३०.१७ कोटी रुपयांवर गेले. सद्य:स्थितीत या उमद्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर समभाग २.९४ टक्क्यांनी वधारला. युनियन बँकेच्या नक्त एनपीएचे प्रमाण मात्र डिसेंबर २०१३ अखेर २.२६% असून, जे सप्टेंबर २०१३ तिमाहीअखेर २.१५% तर डिसेंबर २०१२ अखेरच्या १.७०% स्तरावरून लक्षणीय वाईट वळण घेताना दिसत आहे.
त्याउलट सार्वजनिक क्षेत्रांतील सिंडिकेट बँकेने तिमाहीत निव्वळ नफ्यात मागील तुलनेत २५.२ टक्क्यांच्या तूट सोसावी लागली असली तरी, एनपीए प्रमाणात घट आणि त्यापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीतील घट मात्र आशादायी आहे. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१२ तिमाहीत कर-परताव्याच्या रूपात मिळालेल्या १४१ कोटी रुपयांमुळे यंदाच्या तिमाहीअखेरचा ३८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा त्या तुलनेत २५ टक्क्य़ांनी घसरलेला दिसतो. पण हा विशेष लाभ वजा केल्यास तिमाहीतील नफा प्रत्यक्षात १३ कोटींच्या वाढीचा दिसला असता, असे सिंडिकेट बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सिंडिकेट बँकेचा ढोबळ एनपीएमध्ये तिमाहीगणिक ०.८ टक्क्यांची घट झाली असून, नक्त एनपीए १.६६ टक्क्यांवर स्थिर असल्याचे डिसेंबर २०१३ अखेर दिसून आले. परिणामी शुक्रवारी बँकेच्या समभागाने ३.०८ टक्क्यांची उसळी घेतली.
पंजाब नॅशनल बँकेनेही शुक्रवारी ४.८२ टक्क्यांची उसळी घेतली. बँकेच्या तिमाही निव्वळ नफ्यात ४२.१४ टक्क्यांची घसरण झाली असली तरी नक्त एनपीएच्या प्रमाणात ३.०७ टक्क्यांवरून २.८ टक्के घसरणीपर्यंतच्या सुधारणेला गुंतवणूकदारांनी पसंती दिली. शुक्रवारी निकाल जाहीर करणाऱ्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सनेही तिमाहीत निव्वळ नफ्यात ३१.२८ टक्क्यांची तूट दर्शविली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे दिशानिर्देश काय?
ल्ल बँकिंग व्यवस्थेतील कर्ज-बुडिताचे वाढते प्रमाण आणि परिणामी नफाक्षमतेला कात्री लागण्याच्या समस्येपासून वाणिज्य बँकांना दिलासा देईल, असा सुधार घडविणारे नवीन प्रारूप रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी जाहीर केला. पूर्वसंकेत आगाऊ ओळखून या प्रकरणी प्रत्येक पायरीवर बँकांनी काय काळजी घ्यावी यासाठी जारी केल्या गेलेल्या दिशानिर्देशांचे प्रारूप असे-
१. वाणिज्य बँकांनी कर्ज-थकीताच्या संकेतांची आगाऊ निश्चिती करावी.
२. अशा अडचणीत येऊ शकणाऱ्या कर्ज खात्यांची त्वरेने फेररचना करावी.
३. कर्जफेड थकविली जाण्याआधीच वेळीच वसुलीचे प्रयत्न सुरू करावेत.
अडचणीत असलेल्या कर्ज खात्यांची ‘स्पेशल मेन्शन अकाऊंट्स’ अशी वर्गवारी करावी. शिवाय मुद्दल आणि त्यावरील कर्ज रकमेच्या थकीताचा कालावधी ३० दिवस ते ९० दिवस पाहून या खात्यांच्या तीन उप-वर्गवाऱ्या कराव्यात, असे रिझव्‍‌र्ह बँकेने सुचविले आहे. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकलेल्या कर्जखात्याची पुनर्रचना करण्यासाठी बँकांनी स्वतंत्र मूल्यांकन समितीकडे ही खाती अवलोकनासाठी पाठवावीत. या बँकेबाहेरच्या त्रयस्थ समितीने व्यवहार्यता तपासून आपला अहवाल ३० दिवसांच्या आत द्यायला हवा.