केंद्र सरकारने ‘सर्वासाठी घरे’ योजनेला दिलेली मंजुरी व शहरी भागातील गरिबांना स्वस्त दरात देऊ केलेला वित्तीय पुरवठा यामुळे महाराष्ट्रातील आघाडीचा स्थावर मालमत्ता समूह असलेल्या परांजपे स्कीम्सच्या पुण्यानजीकच्या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात नावाजलेल्या परांजपे स्कीम्सचे अस्तित्व ठाणे, मुंबईत निर्माण झाल्यानंतर समूहाने आता निमशहरी तसेच ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत समूह पुण्यानजीक वरवे येथे माफक दरातील घरांची निर्मिती करत आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.
परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) चे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ एकर जागेवरील या प्रकल्पात २,००० घरे असतील. त्यांच्या किमती १२ ते २५ लाख रुपये दरम्यान व आकार ३५० ते ८५० चौरस फूट असेल. येत्या अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षाही परांजपे यांनी व्यक्त केली.
कंपनी पुणे परिसरातच वाघोल व तळेगाव येथेही याच दर्जाची (माफक दरातील) घरे तयार करण्याच्या विचारात असल्याचेही परांजपे म्हणाले. गृह निर्माण क्षेत्रात सुलभ वित्तपुरवठा झाल्यास त्याचा पुढील १० ते १५ वर्षे सकारात्मक परिणाम नोंदला जातो, असे निरीक्षणही परांजपे यांनी नोंदविले.
गेल्या जवळपास तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या व १६० प्रकल्प पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या परांजपे स्कीम्सचे देशभरातील विविध १२ शहरांमध्ये निवासी प्रकल्प आहेत. गृहनिर्माणसह एकूण भारतीय अर्थव्यवस्थेत येत्या काही तिमाहींमध्ये गती पाहायला मिळेल, असेही परांजपे म्हणाले.