नवी दिल्ली : देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जुलैमध्ये मागील वर्षांतील याच महिन्याच्या तुलनेत २.७१ टक्के घसरण झाली आहे. गेले नऊ महिने महिनागणिक वाढत आलेली वाहन विक्री यंदा प्रथमच रोडावली आहे.

ऐन सण-समारंभाच्या तोंडावर वाहन निर्मिती कंपन्यांना विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे. मात्र मागील वर्षी जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी वाहन निर्मित्यांनी दिलेल्या सूट-सवलतींमुळे कार विक्री जोमदार वाढली होती, त्या आधाराच्या परिणामी यंदा विक्रीत तुलनेने घसरण दिसत आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये एकूण वाहन विक्री एक कोटींवर गेली आहे. ही वाढ वार्षिक तुलनेत १७ टक्के होती. तर जुलै महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री २,९०,९६० झाली आहे. वर्षभरापूर्वी ती २,९९,०६६ होती. तर देशांतर्गत बाजारपेठेत यंदा कारविक्रीतही वर्षभरापूर्वीच्या १,९२,८४५ वरून १,९१,९७९ पर्यंत घसरण झाली आहे.

मोटरसायकल विक्री मात्र ९.६७ टक्क्यांनी वाढून ११,५०,९९५ झाली आहे. तर एकूण दुचाकी वाहन विक्री ८.१७ टक्क्यांनी विस्तारत १८,१७,०७७ नोंदली गेली आहे. दुचाकीमध्ये स्कूटर विक्री ५.१२ टक्क्यांनी वाढून ५,९८,९७६ झाली आहे.

सरलेल्या जुलै महिन्यात व्यापारी वाहनांची विक्री २९.६५ टक्क्यांनी वाढून ७६,४९७ पर्यंत पोहोचली आहे. तर एकूण वाहन विक्री ७.९७ टक्के वाढत २२,४४,८७५ पर्यंत पोहोचली आहे.