पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं सत्र आजही कायम आहे. सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

यापूर्वी सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७३.७५ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.३७ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर७३.१७ रूपये प्रति लीटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७८.५५ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७०.८४ रूपये प्रति लीटर झाले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.