आदेशाला स्थगिती देण्याची अर्जाद्वारे मागणी

मुंबई : पीएनबी हाऊसिंग फायनान्सने कार्लाइल समूहाच्या नेतृत्वात असलेल्या ४,००० कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीला स्थगिती देणाऱ्या सेबीच्या आदेशाला आव्हान देणारा अर्ज प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाकडे (एसएटी) सोमवारी दाखल केला.

सेबीने पीएनबी हाऊसिंग फायनान्सला एका आदेशान्वये भांडवली विक्री करण्यास मनाई केली होती. पीएनबी हाऊसिंग फायनान्सने एका पत्राद्वारे असा आदेश प्राप्त झाल्याची माहिती देशातील शेअर बाजारांना १ जून रोजी दिली होती.

कंपनीने २२ जून रोजी समभागधारकांची या प्रस्तावासाठी मान्यता मिळविण्यासाठी एका विशेष सर्वसाधारण सभेचेही आयोजन केले होते.

प्राधान्य समभाग आणि वॉरंट विक्रीच्या माध्यमातून भांडवली उभारण्याची पीएनबी हाऊसिंग फायनान्सची योजना होती. अल्पसंख्याक भागधारकांच्या हितसंबंधांना बाधा येत असल्याचे  आणि बाजारभावापेक्षा प्रस्तावित विक्रीची किंमतही कमी असल्याचे कारण देत सेबीने या प्रस्तावास स्थगिती दिली होती.