करोना कहर जसा निर्यात व्यापाराच्या पतनास कारण ठरला, तसाच तो त्यातील ताज्या विधायक संक्रमणासही कारणीभूत ठरला आहे. मुख्यत: औषधी आणि औषधी संयुगांच्या तसेच तयार वस्त्रप्रावरणाच्या विदेशातील रवानगीने भारताची निर्यात मागील वर्षांच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा ५.९९ टक्क्य़ांच्या वाढीसह २७.५८ अब्ज अमेरिकी डॉलर गाठणारी ठरल्याचे सरकारने गुरुवारी जाहीर केले. आधीचे सलग सहा महिने निर्यातीत  निरंतर घसरण सुरू होती.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, भारताच्या आयात व्यापारात सप्टेंबरमध्ये १९.६ टक्क्य़ांनी ऱ्हास होऊन, तो ३०.३१ अब्ज डॉलरवर सीमित राहिला. त्यामुळे आयात-निर्यातीतील तफावत असलेली व्यापार तूट अवघी २.७२ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही तूट जवळपास पाच पट अधिक ११.६७ अब्ज डॉलरची होती. आयात घसरणीत सर्वाधिक योगदान हे सोन्याच्या मागणीतील ५३ टक्क्य़ांच्या घसरणीचे राहिले.

एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील एकत्रित निर्यात ही मागील वर्षांच्या याच सहामाहीच्या तुलनेत १६.६६ टक्क्य़ांनी घसरून २२१.८६ अब्ज डॉलर इतकी नोंदली गेली आहे. तर आयातीमधील सहामाही घसरण ३५.४३ टक्क्य़ांची असून, एकत्रित प्रमाण २०४.१२ अब्ज डॉलर इतके आहे.