आयुर्विमा योजनांचे स्वतंत्र व्यवसायाद्वारे परिचालन

देशभरात दुर्गम क्षेत्रासह विस्तारीत जाळे असलेल्या पोस्ट अर्थात टपाल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आयुर्विमा योजनांचे आता स्वतंत्र व्यवसायाद्वारे परिचालन करण्यात येणार आहे. याअंतर्गत टपाल विभागाची बँकिंग व्यवसायासह आता स्वतंत्र विमा कंपनीही लवकरच कार्यान्वित होणार आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली. टपाल आयुर्विमा आणि ग्रामीण टपाल आयुर्विमा अशा दोन प्रकारातील विमा योजनांचे व्यवस्थापन आता स्वतंत्र व्यवसाय उपक्रमातून पाहिले जाईल, असे ते म्हणाले. याबाबतचा प्रस्ताव खात्याने केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविला असून येत्या पंधरवडय़ात त्याला मंजुरी मिळेल, असेही सिन्हा यांनी सांगितले.

टपाल विभागामार्फत जवळपास १३५ वर्षांपूर्वी म्हणजे १८८४ साली टपाल आयुर्विमा आणि १९९५ मध्ये ग्रामीण टपाल आयुर्विमा अशा योजना सुरू करण्यात आल्या आणि त्या अद्याप कार्यरत आहेत.

इंडिया पोस्ट बँकेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या सिन्हा यांनी, या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात व्यवसाय केंद्र तसेच दुसऱ्या टप्प्यात विमा कंपनी अस्तित्वात येईल, अशी माहितीही दिली.

इंडिया पोस्ट बँकेचे अस्तित्व सध्याच्या १.२६ लाख सेवा केंद्रावरून येत्या काही दिवसांमध्ये एकूण १.३६ लाख केंद्रांपर्यंत विस्तारणार असून त्यामार्फत ३० लाख ग्राहकांना सेवा दिली जाते, असे सिन्हा यांनी या वेळी सांगितले. टपाल खात्याचे एक लाखांहून अधिक बचत बँक खातेदार असून पोस्ट बँकेच्या मोबाइल बँकिंगचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ८ लाखांहून अधिक असल्याचे ते म्हणाले.