खासगी विमा कंपन्यांना विदेशी भांडवलाचे स्फुरण

एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स या भारतातील खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनीच्या प्रवर्तक एचडीएफसी लि.ने आपली या उपक्रमातील विदेशी भागीदार ब्रिटनच्या स्टँडर्ड लाइफला आणखी ९ टक्के हिस्सा १,७०० कोटी रुपयांना विकण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण केली.

गत वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, एचडीएफसीने स्टँडर्ड लाइफला ९ टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केली होती. प्रत्येकी ९५ रुपये या किमतीला या आयुर्विमा कंपनीचे १७.९५ कोटी समभाग स्टँडर्ड लाइफला विकण्यात आले आहेत. ज्यायोगे १,७०५ रुपये एचडीएफसीने मिळविले आहेत.

या व्यवहारापश्चात संयुक्त भागीदारीतील विमा कंपनीत ब्रिटिश भागीदार स्टँडर्ड लाइफचा वाटा ३५ टक्क्यांवर गेला आहे, तर एचडीएफसीचा वाटा ६१.६५ टक्क्यांवर आला आहे.

रिलायन्स कॅपिटलला २,२६५ कोटींचा लाभ

अनिल अंबानीप्रणीत उद्योग समूहातील रिलायन्स कॅपिटल या कंपनीने ‘रिलायन्स लाइफ इन्शुरन्स’ या खासगी आयुर्विमा कंपनीतील आपली जपानी भागीदार निप्पॉन लाइफ इन्श्युरन्स आणखी २३ टक्के हिस्सा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

या व्यवहारात रिलायन्स लाइफचे १०,००० कोटी रुपये असे मूल्यांकन केले गेले असल्याचे, २३ टक्के हिश्शासाठी निप्पॉन लाइफने दिलेल्या २,२६५ कोटी रुपयांच्या मोबदल्यातून स्पष्ट होते. या व्यवहारापश्चात रिलायन्स लाइफमध्ये रिलायन्स कॅपिटलचा ५१ टक्के हिस्सा तर निप्पॉन लाइफचा ४९ टक्के हिस्सा झाला आहे.