बँक क्षेत्रासाठी नव्या वर्षांची सुरुवात पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ज्ञान संगम’ विचारमंथनाने होणार असताना, वर्षांचा पहिला महिना संप व आंदोलनाने गाजवण्याचा बँक कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे. देशभरातील १० लाख बँक कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन – यूएफबीयू’ने ७ जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तसेच याच महिन्यात २१ ते २४ दरम्यान सलग चार दिवस बँक उद्योग ठप्प ठेवण्याचा पवित्राही घेतला आहे.
वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवसायावर चर्चा करणारी दोन दिवसीय ‘ज्ञान संगम’ परिषद शुक्रवारपासून पुण्यात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या विचारमंथनात वित्त खात्यातील तसेच बँक क्षेत्रातील अनेक अधिकारी भाग घेणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित वेतनवाढीच्या मागणीसाठीचे हत्यारही याच महिन्यात उचलले आहे.
‘यूएफबीयू’ च्या पंखाखाली देशभरातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध नऊ संघटना येत्या ७ जानेवारी रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करणार आहेत. संघटनेचा २३ टक्के वेतनवाढीचा आग्रह असताना बँक व्यवस्थापन ११ टक्क्य़ांवर ठाम आहे. याच महिन्यात पुन्हा चार दिवसांचा देशव्यापी संप पुकारला जाईल. मागण्या मान्य न झाल्यास १६ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याच्या निर्णयही घेतला आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी दिली.
१.४० लाख कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावणाऱ्या व बुडीत कर्जासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या बँक क्षेत्राची अधिक वेतनवाढ देण्यासारखी स्थिती नाही, ही सरकारची भूमिका विरोधाभासाची असल्याचे उटगी यांनी सांगितले. उलट २.६० लाख कोटी रुपयांचे बुडीत कर्जे वसुलीसाठी बँका प्रयत्न करत नसल्याचा दावा त्यांनी केला.