रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा

आगामी महिन्यात नियोजित असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्र्वीच डॉ. रघुराम राजन यांच्या निवृत्तीपश्चात रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी बसणाऱ्या नव्या व्यक्तीचे नाव घोषित केले जाण्याचे संकेत आहेत. राजन यांचे वारसदार म्हणून माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर असल्याचे दिसून येते.
गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून विहित तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, मुदतवाढ घेण्यापेक्षा निवृत्ती स्वीकारून पुन्हा अध्यापन कार्यात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, केंद्र सरकारने त्यांच्या वारसदाराचा शोध सुरू केला आहे. डॉ. राजन यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला संपुष्टात येत आहे, तर त्यांची जागा घेणाऱ्या नवीन गव्हर्नरांच्या
निवडीवर जुलैच्या मध्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थमंत्री जेटली यांच्याशी सल्लामसलत करून या संदर्भात अंतिम निर्णय घेतील.
सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) वर भारताचे कार्यकारी संचालक म्हणून प्रतिनिधित्व करीत असलेले राकेश मोहन यांची ९ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑक्टोबर २००४ तसेच २ जुलै २००५ ते १० जून २००९ अशी दोनदा रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कारकीर्द राहिली आहे. २००४-०५ मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयात अर्थ व्यवहार सचिव, तर २००१-०२ मध्ये भारताचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
मोहन यांच्या व्यतिरिक्तआणखी डझनभर नावे गव्हर्नरपदासाठी चर्चेत आहेत. त्यात स्टेट बँकेच्या विद्यमान अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण, सध्याचे डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन, कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांच्या नावांचा समावेश आहे.