पाच वर्षांनंतर झालेल्या सरकारच्या दूरसंचार ध्वनिलहरी परवाने लिलावात मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी खरेदीदार कंपनी बनली आहे. लिलावापोटी सरकारला मिळालेल्या ७७,८१५ कोटी रुपयांच्या महसुलापैकी निम्म्याहून अधिक, ५७,१२२ कोटी रुपये जिओमार्फत आले आहेत.

कंपनीने सर्व, २२ परिमंडळातील ध्वनिलहरींसाठी रिलायन्सची बोली मान्य केली. त्यासाठी कंपनीने ५७,१२३ कोटी रुपये मोजले. स्पर्धकांच्या तुलनेत ही रक्कम सर्वाधिक ठरली. ४८८.३५ मेगाहर्ट्झ ध्वनिलहरींमुळे कंपनीचे अस्तित्व आता ५५ टक्क्य़ांहून उंचावत १,७१७ मेगाहर्ट्झपर्यंत पोहोचले.

विविध सात बँडमध्ये २,३०८.८० मेगाहर्ट्झसाठी गेल्या दोन दिवसांपासून दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रिया सुरू होती. ४ लाख कोटी रुपये राखीव किंमत असलेल्या या प्रक्रियेत मात्र शेवटच्या दिवशीही ७०० व २,५०० मेगाहर्ट्झसाठी बोली लागू शकली नाही. बुधवारअखेर लिलाव झालेल्या ८५५.६० मेगाहर्ट्जसाठी ७७,८१४.८० कोटी रुपये मिळाल्याचे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले. सर्व परवान्यांपैकी ६० टक्के लिलाव किमान किमतींवर झाल्याचेही ते म्हणाले.

सरकारदफ्तरी ७७,८१५ कोटी जमा

रिलायन्स जिओ : रु. ५७,१२३ कोटी

भारती एअरटेल : रु. १८,६९९ कोटी

व्होडाफोन आयडिया : रु. १,९९३.४० कोटी