मुंबई : बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मार्च २०१९ अखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीअखेर १०,३६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मुख्यत: दूरसंचार आणि किराणा व्यवसायातील दमदार उत्पन्नाच्या परिणामी हा विक्रमी तिमाही नफा कंपनीने नोंदविला असून, तो मागील वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत ९.८ टक्के अधिक आहे. तथापि, कंपनीच्या परंपरागत तेल व्यवसायातून तेलशुद्धीकरण क्षमता (जीआरएम) आणि नफाक्षमताही घसरल्याचे दिसले आहे.

जानेवारी-मार्च २०१९ तिमाहीतील रिलायन्सचा १०,३६२ कोटींचा करोत्तर नफा हा प्रत्येक समभागामागे १७.५ रुपयांची मिळकत देणारा आहे, जो वर्षभरापूर्वी याच तिमाहीअखेरच्या १५.९ रुपये प्रति समभाग मिळकतीपेक्षा जास्त आहे. कंपनीचे एकूण उत्पन्नही तिमाहीत १९.४ टक्क्यांनी वाढून १,५४,११० कोटी रुपयांवर गेले आहे.

रिलायन्सच्या परंपरागत तेल व्यवसायाची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली आहे. या व्यवसायाचा कंपनीत आजही सुमारे ८५ वाटा आहे आणि त्यातील मार्चअखेर तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक तुलनेत १.६ टक्के घसरला आहे. त्या तुलनेत किराणा व्यवसायातील निव्वळ नफा ७७ टक्क्यांनी वाढून १,९२३ कोटी रुपयांवर, तर दूरसंचार व्यवसायातील निव्वळ नफा ७८.३ टक्के वाढून २,६६५ कोटी रुपयांवर गेला आहे.

रिलायन्सच्या तिमाही कामगिरीची घोषणा गुरुवारी भांडवली बाजारात व्यवहार आटोपल्यावर संध्याकाळी उशिरा करण्यात आली. मात्र चांगल्या तिमाही कामगिरीच्या आशेने बाजारात रिलायन्सच्या समभागाला चांगली मागणी राहिली. प्रमुख निर्देशांक घसरणीला असतानाही, दिवसाअखेरीस २.७९ टक्के वाढ दर्शवीत समभागाने १,३८२.९० रुपये किमतीपर्यंत प्रवास केला. राष्ट्रीय शेअर बाजारात ३.१४ वाढीसह १,३८६.०५ रुपयांच्या उच्चांकापर्यंत त्याने मजल मारली होती.