इंधन दरवाढ व रूपयाचं अवमूवल्यन यांचा फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर विमान कंपन्यांनाही फटका बसला आहे. या आर्थिक वर्षात भारतीय विमान कंपन्यांचा प्रस्तावित तोटा (करपूर्व उत्पन्न) हा तब्बल 9,300 कोटी रुपयांचा होईल असा अंदाज क्रिसिल या पतनिर्धारण संस्थेने वर्तवला आहे. विमान कंपन्यांचा गेल्या दहा वर्षांमधला हा सगळ्यात जास्त तोटा असल्याचे क्रिसिलने नमूद केले आहे. 2014 मध्ये विमान कंपन्यांना 7,348 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला होता, त्यानंतर तीन वर्षे या कंपन्यांना दरवर्षी अंदाजे सरासरी 4,000 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये विमानाला लागणाऱ्या इंधनाचा म्हणजे एअर टर्बाइन फ्युएलचा हिस्सा तब्बल 35 ते 40 टक्के असतो. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत एटीएफच्या दरांमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. सरकारनं एक्साइज ड्युटी काहिशी कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे तोटा कमी होण्यास काहीच मदत होणार नाही असे चित्र आहे.

विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये व उत्पन्नामध्ये एटीएफची किंमत व विदेशी चलनाच्या चुलनेत रुपयाची किंमत यांना महत्त्वाचं स्थान असतं, असं क्रिसिल रेटिंगचे सीनियर डायरेक्टर सचिन गुप्ता यांनी सांगितले. विमान कंपन्यांची विस्ताराची आक्रमक उद्दिष्ट्ये व जास्तीत जास्त प्रवासी वाहण्याची गरज यामुळे तिकिटांचे दर वाढवण्यावर मर्यादा असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

विमान कंपन्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जामध्ये विदेशी चलनातील कर्जाचा मोठा असतो. एकूण कर्जापैकी जवळपास 73 टक्के कर्ज हे विदेशी चलनातील असते व कंपन्यांचे उत्पन्न मात्र भारतीय रूपयात मिळते. भारतीय शेअरबाजारात नोंदणी असलेल्या तीन विमान कंपन्यांचा एकत्रित कर्जाचा बोजा 10 टक्क्यांनी वाढेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.