आरपी इन्फोसिस्टमच्या तीन संचालकांविरुद्ध सीबीआयची कारवाई

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या थकीत कर्ज घोटाळ्याच्या मालिकेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे नाहीत. याच मालिकेत बुधवारी कॅनरा बँकेच्या रूपाने एक नवा अध्याय जोडला गेला. ७८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कॅनरा बँकेने आरपी इन्फोसिस्टमविरुद्ध तक्रार दाखल केली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत कंपनीच्या संचालकांची नावेही आहेत.

आरपी इन्फोसिस्टम ही कोलकत्तास्थित संगणक निर्माती कंपनी आहे. तर तिचे संचालक शिवाजी पांजा हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या तक्रारीत पांजा यांच्यासह कौस्तुव रे, विनय बाफना या कंपनीच्या अन्य संचालकांचीही नावे आहेत.

कंपनीला कॅनरा बँकेने ७८० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. बनावट कागदपत्रे तसेच कंपनीच्या समभागांचे मूल्य फुगवून कंपनीच्या संचालकांनी कॅनरा बँकेकडून कर्ज उचलल्याचे याबाबतच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीला दिलेल्या एकूण कर्जापैकी किमान ४० कोटी रुपयांची तरी फसवणूक झाल्याची शंका बँकेने व्यक्त केली आहे. या प्रकरणात बँकेचे काही अधिकारी असण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे.

आरपी इन्फोसिस्टम व तिच्या संचालकांविरुद्ध यापूर्वी २०१५ मध्ये आयडीबीआय बँकेने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये बँकेचे १८० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीने २०१२ मध्ये बँकांमधून कर्ज घेतले होते; यानंतर ते थकीत झाले.

नीरव मोदीच्या रूपाने सुरू झालेल्या थकीत कर्ज फसवणूक प्रकरणात पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँकेचे नाव पुढे आले. यानंतर रोटोमॅकचे प्रवर्तक विक्रम कोठारीविरुद्ध बँक ऑफ बडोदाने तक्रार दाखल केली. आरपी इन्फोसिस्टम्सच्या रूपात बँकांनी तिसऱ्या कंपनी व तिच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ महाराष्ट्र यांचीही नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जामध्ये फसवणूक झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून मोदीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलाबाद बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूनियन बँक ऑफ इंडिया तसेच स्टेट बँकेकडूनही कर्ज उचलले. नीरव मोदी प्रकरणात कारवाई वेगाने होत असतानाचा हा घोटाळा ११,४०० कोटी रुपये नव्हे तर १२,६०० कोटी रुपयांचा असल्याचे पंजाब नॅशनल बँकेने मंगळवारीच स्पष्ट केले.

‘पीएनबी’च्या मुख्य लेखापरीक्षकाला अटक

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य लेखापरीक्षकाला अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. एम. के. शर्मा असे या मुख्य लेखापरीक्षकांचे नाव असून बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत ते कार्यरत होते. शाखेतील विविध त्रुटी विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याची मुख्य जबाबदारी शर्मा यांच्यावर होती. बँकेशी संबंधित व्यवहारांचे लेखा परीक्षण करण्याची जबाबदारी असतानाही या घोटाळ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.