खाद्यपदार्थ निर्मितीतील रुची सोया इंडस्ट्रीजने जपानच्या कॅगोम आणि मित्सुईबरोबर सामंजस्य करार करत भारतात टोमॅटोशी निगडित विविध उत्पादनासाठी भागीदारी कंपनी सुरू केली आहे. या संयुक्त भागीदारी अंतर्गत महाराष्ट्रात प्रारंभिक ४४ कोटींच्या गुंतवणुकीतून जून २०१४पर्यंत उत्पादन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीने ३४० कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट राखले आहे.
थेट शेतकऱ्यांकडून टोमॅटो घेऊन प्रक्रिया केलेले उत्पादन सादर करणारा हा प्रकल्प राज्यात नाशिक अथवा पुण्यानजीक असण्याची शक्यता आहे. यासंबंधाने चाचपणी सुरू असून अधिकृत घोषणा नंतर केली जाणे अपेक्षित आहे.
जगातील (चीननंतर) दुसरा मोठा टोमॅटो उत्पादक देश असणाऱ्या भारतात वर्षांला  १.७ टन टोमॅटोचे उत्पादन होते; मात्र पैकी एक टक्का प्रमाण टोमॅटोवर आधारित प्रक्रिया केलेल्या उत्पादनासाठी वापरले जाते. सॉस, केचप, प्युरी आदी पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठय़ा प्रमाणात आयात करावा लागतो.
अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे, स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावरील माहिती देणे तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी स्थानिक पाठिंबा केंद्रे स्थापन करणे आदी उपक्रम यासाठी कंपनीमार्फत राबविले जाणार आहेत.
नव्या भागीदार कंपनीच्या सहकार्याने येत्या पाच वर्षांत या बाजारपेठेतील २० टक्के हिस्सा काबीज करण्याचा मनोदय रुची सोयाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिनेश शहारा यांनी व्यक्त केला. रुची कॅगोम या भागीदारी कंपनीत रुची सोयाचा ४० टक्के तर कॅगोम आणि मित्सुई यांचा अनुक्रमे ६६.७ व ३३.३ टक्के हिस्सा आहे.