डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून स्थानिक चलन मंगळवारी आणखी चार पैशांनी रोडावले. रुपया व्यवहाराखेर ५९.७६ वर स्थिरावला. अमेरिकन चलनापुढे रुपयाने कालही ३७ पैशांची नांगी टाकत ५९.७२चा तळ गाठला होता. तत्पूर्वी गेल्याच बुधवारी त्यात जवळपास याच प्रमाणात घट नोंदली गेली होती.
चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी सोमवारी उशिरा रिझव्र्ह बँकेने सोन्यावरील र्निबध विस्तारल्यानंतर सकाळच्या व्यवहारात भारतीय चलन उंचावले होते; मात्र आयातदारांच्या वाढत्या मागणीने दिवसअखेर ते रोडावत आठवडय़ाच्या नीचांकाला स्थिरावले. चलनाची १५ जुलै रोजी ६० नजीकची पातळी होती.
भारतीय चलनाच्या आगामी प्रवासाबाबत मत व्यक्त करताना बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच या वित्तसंस्थेने, मार्च २०१४ अखेर रुपयाचा तळ डॉलरच्या तुलनेत ६५ पर्यंत जाईल, असे आपल्या अहवालात भाकीत केले आहे. म्हणजेच आगामी सहा महिन्यांत रुपया आणखी ३.५ टक्क्यांची घसरण नोंदवेल, असा अंदाज आहे. डॉलर-युरोमधील दरीत फरक पडला तर रुपयाही ५८ ते ६२ असा फिरेल, असे नमूद करून रुपया २०१३-१४ या वर्षांत ६५ पर्यंतही जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 1:05 am