डॉलरच्या तुलनेत ५६ खाली घसरगुंडी उडालेल्या भारतीय चलनाचा प्रवास सलग दुसऱ्या दिवशीही निसरडाच राहिला. गुरुवारी  २१ पैशांनी घसरत रुपया ५६.३८ या गेल्या दहा महिन्याच्या नव्या नीचांक पातळीपर्यंत खाली आला. चालू आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच्या रुपयातील घसरणीला अटकाव करण्याची अपेक्षा वाढली असतानाच, अल्पकालासाठी चलनातील नीचांकी कायम असेल असे  रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी केलेल्या विधानाने रुपयाच्या घसरणीला आणखीनच जोर चढला.
भांडवली बाजारात विदेशी निधीचा ओघ निरंतर सुरू असला तरी आयातदारांनी सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकन चलनाच्या चालविलेल्या खरेदीच्या माऱ्याने दिवसभरात ५६ वर स्थिरावलेला रुपया गव्हर्नर सुब्बराव यांच्या वक्तव्याने ५६.३९ पर्यंत घसरला. दिवसअखेर कालच्या तुलनेत तो सावरला आणि माफक ०.३७ टक्क्यांनी आणखी खालावला.
गेल्या तीन दिवसांच्या व्यवहारात भारतीय चलन ८१ पैशांनी घसरले आहे. तर एकूण मेमधील आतापर्यंतची घसरण ४.५ टक्क्यांची आहे. शुक्रवारी जाहिर होत असलेला देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर ५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास रुपयाही ५६.५० पर्यंत खाली जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.