२०१३ प्रमाणे डॉलरमध्ये ठेवी उभारण्याच्या उपायांकडे कल अपरिहार्य

मुंबई : भारतीय रुपयाच्या विनिमय मूल्याची अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ६९ रुपयांपल्याड सार्वकालिक नीचांकी घसरण पाहता, नजीकच्या काळात ६८ ते ७२ हाच रुपयाच्या मूल्याच्या हालचालीचा नवीन टप्पा राहील, असे कयास केले जात आहेत. तथापि, रिझव्‍‌र्ह बँक रुपयातील अस्थिरतेवर नियंत्रणासाठी कितपत आणि केव्हा हस्तक्षेप करेल, याबाबतही विश्लेषकांमध्ये उत्सुकता आहे.

सोमवारच्या प्रति डॉलर ३४ पैशांच्या घसरगुंडीतून रुपया मंगळवारी चांगलाच सावरलेला दिसला. स्थानिक भांडवली बाजारात दिसलेली मूल्यात्मक खरेदी आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून लक्षणीय प्रमाणात झालेल्या डॉलरच्या उपलब्धता तसेच निर्यातदार-व्यापाऱ्यांनी केलेल्या डॉलरच्या विक्रीने रुपया मंगळवारी २३ पैशांनी सावरून ६८.५७ या पातळीवर स्थिरावलेला दिसला.

चालू वर्षांत आजतागायत रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत तब्बल ८ टक्क्यांनी घसरले आहे. गुरुवारी (२८ जून) रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६९.१० या ऐतिहासिक नीचांकापर्यंत रोडावलेले दिसले. दिवसअखेर रिझव्‍‌र्ह बँकेकडून झालेल्या डॉलरच्या विक्रीमुळे रुपया सावरताना दिसला. पुन्हा सोमवारी ३४ पैशांच्या घसरणीने रुपयाने ६८.८० हा नीचांक गाठला. पाच वर्षांपूर्वी २८ ऑगस्ट २०१३ रोजी रुपया-डॉलर विनिमय मूल्याचा हा स्तर होता. भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची तीव्र स्वरूपातील निर्गुतवणूक, जागतिक स्वरूपातील डॉलरच्या मूल्यात मजबुतीबरोबरच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील वाढीने रुपयाच्या मूल्यावर मोठा ताण आणला आहे. चालू वर्षांत विदेशी संस्थांनी तब्बल ६० हजार कोटी भारताच्या समभाग आणि रोखे बाजारातून काढून घेतले आहेत.

वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक अग्रणी यूबीएसच्या मते, बाह्य़ परिस्थितीचा रुपयावरील ताण असाच कायम राहणार असून, अमेरिकी अर्थव्यवस्थेतील उभारीसह डॉलरच्या मूल्य सशक्त होत राहील. या स्थितीत धोरणकर्ते आणि रिझव्‍‌र्ह बँकेने २०१३ प्रमाणे पुन्हा अमेरिकी चलन – डॉलरमध्ये ठेवी उभारण्याचा शेवटचा पर्याय रुपयाच्या बचावासाठी वापरणे अपरिहार्य ठरेल. नजीकच्या काळात प्रति डॉलर ६८ ते ७२ या टप्प्यात रुपयाच्या मूल्याचा घरोबा असेल, असे यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालाचा कयास आहे. मात्र आर्थिक २०१९-२० अखेपर्यंत रुपयाचे मूल्य पुन्हा ६६.५ स्थिरावताना दिसेल, असाही अहवालाचा निष्कर्ष आहे.

आयएफए ग्लोबल रिसर्चने रुपयाचे मूल्य सहा वर्षांच्या नीचांकापासून फार दूर नसल्याचे प्रतिपादन केले आहे. चीन-अमेरिका महासत्तांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाची संबंध जागानेच धडकी घेतली आहे. रुपयाच्या सलगपणे सुरू असलेल्या घसरणीने भारतातील आयातदार व्यापाऱ्यांनी भीतीपोटी डॉलरची मागणी वाढविली आहे. यातून रुपयाच्या मूल्यावर आणखीच ताण येत आहे आणि परिणामी रुपयाने ७० वेस ओलांडेल, असा आयएफए ग्लोबलचा अंदाज आहे.

चिंतेचे कारण नसावे – निती आयोग

रुपयाचे डॉलरच्या तुलनेत ६९ च्या पातळीवर घसरणे ही प्रतिकूल जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत चलनवाढीच्या चिंतेचा संयुक्त परिणाम असून, वास्तविक प्रभावी विनिमय दरात रुपयाचे अवमूल्यन तितकेसे झालेले नाही, असा दावा निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला. रुपयाच्या तीव्र घसरणीबाबत मोदी सरकारवर होत असलेल्या टीकेचे निराकरण करताना ते म्हणाले, आधीच्या यूपीए-२ राजवटीत २०१३ सालात अवघ्या तीन महिन्यांत रुपयाचे मूल्य ५७ वरून ६८ असे गडगडले होते. तरी त्या स्थितीशी आजच्या घसरणीशी तुलना होणे अनाठायी आहे. रुपयाचे मूल्य निर्धारित पातळीवर राखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून कोणताही हस्तक्षेप होणार नाही अथवा होऊ नये, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.