सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सादर करण्यात आलेला रक्कम जमा प्रस्ताव अखेर माघारी घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले १०,००० कोटी रुपये भरण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या समूहाच्या वकिलांनी ३ एप्रिल रोजी तातडीने २,५०० कोटी रुपये व आणखी २,५०० कोटी रुपये तीन आठवडय़ांत जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. जमा करण्यास सांगण्यात आलेली १०,००० कोटी रुपये रक्कम ही रॉय यांच्या जामिनासाठी नाही; तसेच त्यांना शिक्षा म्हणून सध्या तुरुंगात टाकण्यात आलेले नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर स्पष्ट केले होते. त्यामुळे ४ मार्चपासूनचा ६५ वर्षीय रॉय यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे. त्यांच्याबरोबर समूहाचे दोन संचालकही अद्याप गजाआडच आहेत. गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये गोळा केल्याच्या प्रकरणात सहाराविरुद्ध सेबीने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.