मागासलेल्या ग्रामीण भागाचा विविध उपक्रमांद्वारे विकास करू पाहणाऱ्या कल्पक युवाशक्तीला सन्मानित करणारा ‘एसबीआय फाऊंडेशन’चा प्रमुख कार्यक्रम ‘एसबीआय फॉर युथ’च्या २०१८-१९ सालच्या तुकडीसाठी प्रवेशिका खुल्या झाल्या आहेत. ग्रामीण भारताच्या कळीच्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या युवकांना हेरून त्यांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त अभ्यासवृत्ती (फेलोशिप) १३ महिने कालावधीसाठी यातून दिली जाणार आहे. गावांमध्ये परिवर्तन आणू पाहणाऱ्या युवकांना www.sbiyouthforindia.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया समजून घेता येईल. एसबीआय फाऊंडेशनने हा अभ्यासवृत्ती कार्यक्रम २०११ साली तीन प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू केला. आजवर या माध्यमातून ७४ युवकांनी देशातील १२ राज्यांतील ३५ ग्रामीण क्षेत्रांत कार्य सुरू ठेवले आहे.

‘रंग दे’ मोहिमेतून राज्यभर सामाजिक संदेशांचे वहन

व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) या संघटनेने आंतरराष्ट्रीय रंग दिनानिमित्त ‘रंग दे महाराष्ट्र’ मोहिमेचे आयोजन केले. कन्साई नेरोलॅक आणि टाटा ट्रस्ट यांच्याशी भागीदारीतून ही मोहीम राबविली गेली. २१ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत, महाराष्ट्रातील ११ जिल्ह्य़ांतील १२० ग्रामपंचायती सहभागी होतील आणि ३५० संस्थात्मक इमारती, शाळा, अंगणवाडय़ा आणि ग्रामपंचायतींवर सामाजिक संदेश रंगवण्यात येणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून, ग्रामीण भागातील भिंतींवर समाजविकासासाठी सामाजिक संदेश रंगवून त्यांचे रूपडे पालटण्याचा एमव्हीएसटीएफ आणि नेरोलॅक पेण्ट्सचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या उपक्रमात अनेक कलाकार, मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेतील कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार असून विविध माध्यमांतून ही मंडळी ग्रामीण भागातल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

(या वृत्तान्तांमध्ये केले गेलेले दावे हे कंपन्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहेत.)