मुंबई : भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा घसरण नोंदविली. सलग सहा व्यवहारांनंतर बुधवारी तेजी नोंदविणारे भांडवली बाजार आठवडय़ातील तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करते झाले. देशाच्या विकास दराबाबत खालावलेल्या अंदाजाची चिंताही बाजारात उमटली.

गुरुवारच्या सत्रात ३७५ अंशांपर्यंत आपटी नोंदविल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर बुधवारच्या तुलनेत २९७.५५ अंश घसरणीसह ३७,८८०.४० वर स्थिरावला, तर ७८.७५ अंश घसरणीने निफ्टी ११,२३४.५५ पर्यंत थांबला.

मुंबई निर्देशांकाने बुधवारी तब्बल ६४६ अंश झेप घेतली होती, तर तत्पूर्वीच्या सलग सहाही व्यवहारांत सेन्सेक्स घसरला होता. देशातील बँक, वित्त, गृह वित्त, गैरबँकिंग वित्त क्षेत्रातील अर्थचिंता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या गुरुवारच्या व्यवहाराने व्यक्त झाली.

जागतिक अर्थमंदीच्या वातावरणात भारतासारख्या विकसनशील देशावर अधिक परिणाम होण्याबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेली भीती तसेच मूडीजकडून भारताचा विकासदर ६ टक्क्यांखाली अपेक्षित केल्याचेही सावटही बाजारात उमटले.

दुसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ नोंदवूनही थकीत कर्जात वाढ झाल्याच्या इंडसइंड बँकेच्या वृत्ताने समभागाला ६ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविण्यास प्रवृत्त केले. हिंदूजा समूहातील खासगी बँकेचा समभाग परिणामी सेन्सेक्सच्या घसरण यादीतही सर्वात वर राहिला.

बँक क्षेत्रातील येस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँकेसह टाटा मोटर्स, वेदांता, टाटा स्टील आदीही ५ टक्क्यांपर्यंत घसरले, तर भारती एअरटेल, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक आदी मूल्यवाढ नोंदविणारे ठरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, स्थावर मालमत्ता, वित्त, पोलाद, वाहन निर्देशांक २.६१ टक्क्यांपर्यंत घसरले, तर दूरसंचार, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप टक्क्याने घसरले.