सेन्सेक्स, निफ्टीत घट; बँकांवर दबाव

२०१७ च्या व्यवहारातील पहिलाच दिवस भांडवली बाजाराने घसरणीचा नोंदविला. ३१.०१ अंश घसरणीसह सेन्सेक्स सोमवारअखेर २६,५९५.४५ वर बंद झाला. तर ६.३० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१७९.५० वर स्थिरावला.

पंतप्रधानांच्या नववर्षांभिनंदन भाषणात बँकांना कमी व्याजदराने विविध क्षेत्राकरिता वित्तपुरवठा करण्यास सांगितले गेल्याने बँकांच्या व्यवसायावर ताण पडण्याची भीती बाजारात या क्षेत्रातील समभागांच्या व्यवहारांवरून नोंदली गेली. २०१६ च्या नोव्हेंबरमधील निक्केई निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक ५० टक्क्यांखाली घसरल्याच्या कामगिरीची नोंद बाजाराने घसरणीसह नोंदविली.

मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग दोन व्यवहारांत ४१५.७८ अंश वाढ नोंदविली होती. असे करताना सेन्सेक्सने २०१६ च्या अखेरच्या व्यवहारात तेजी नोंदविली होती. गेल्या वर्षांत सेन्सेक्ससह निफ्टीने दुहेरी अंकातील परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.

२०१७च्या जानेवारीच्या व आठवडय़ातील पहिल्याच व्यवहारात मात्र भांडवली बाजारावर दबाव दिसून आला. सुरुवातीपासून घसरणीच्या छायेत असलेला सेन्सेक्स व्यवहारात २६,४४७.०६ पर्यंत खालीही आला.