अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पपूर्व अस्वस्थता गुरुवारी भांडवली बाजारात नोंदली गेली. व्यवहारात २९,१००वर येऊन ठेपणारा सेन्सेक्स सत्रात २९,५००च्याही पुढे गेला. शेवटच्या दीड तासातील खरेदीच्या जोरावर अखेर मुंबई निर्देशांक सलग सातव्या दिवशीही वाढीसह बंद झाला.
१४२.०१ अंश वाढ राखताना सेन्सेक्स गुरुवारी २९,४६२.२७वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६.२० अंश भर नोंदवीत ८८९५.३०पर्यंत पोहोचला.
केंद्रीय अर्थसंकल्प पुढील आठवडय़ाच्या शेवटी सादर होणार आहे. त्यापूर्वी भांडवली बाजारात मोठय़ा आपटीची शक्यता असतानाच गुरुवारी कमालीची अस्वस्थता नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात २९,१००वरही येऊन ठेपला. तर याच दरम्यान त्याचा प्रवास २९,५००च्या वरही गेला.
कोळसा लिलावात पोलाद निर्मिती कंपन्यांना खाणी मिळाल्याने या क्षेत्रातील समभागांचे मूल्य उंचावले. यामध्ये जिंदाल स्टील पॉवर तर तब्बल २५ टक्क्य़ांनी झेपावला. सोबतच हिंदाल्को, टाटा पॉवर, टाटा स्टील, सेसा स्टरलाइट या संबंधित क्षेत्रातील समभागांनाही २ ते ७ टक्क्य़ांपर्यंतचा भाव आला. एचडीएफसी, इन्फोसिस, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोनेही तेजीत साथ दिली.
अर्थसंकल्पाबरोबरच रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातील अंदाजावरही बाजारात प्रतिक्रिया व्यक्त झाली. व्याजदराशी निगडित समभागांना सलग दुसऱ्या दिवशी मागणी राहिली. सेन्सेक्समधील २० समभागांचे मूल्य वाढले, तर सोने आयातीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने शिथिलता दाखविल्यानंतर पीसी ज्वेलर्स, गीतांजली जेम्ससारख्या मौल्यवान धातू निर्मात्या सूचिबद्ध कंपन्यांचे समभागांनाही मागणी राहिली.
सलग सात सत्रातील तेजीमुळे सेन्सेक्सची वाढ १२३४.८५ अंश राहिली आहे. मुंबई निर्देशांक आता गेल्या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर कायम आहे. अस्थिरतेच्या वातावरणात निफ्टीने गुरुवारच्या सत्रात ८९००ला गाठले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक व्यवहारात ८९१३.४५पर्यंत झेपावला, तर त्याचा  किमान स्तर ८७९४.४५ राहिला.
अर्थसंकल्प तोंडावर असताना भांडवली बाजारात कमालीची अस्वस्थ होतो, याचे उत्तम नमुना गुरुवारी झालेल्या व्यवहारांनी दाखविला. राष्ट्रीय शेअर बाजारात एक क्षण तर असा होता की, निफ्टी निर्देशांक ८९०२ या सत्राच्या सर्वोच्च टप्प्यापासून १०० अंश खाली होता. मात्र ग्रीसने युरोपातील धनकोंना कर्ज मर्यादा विस्तारण्यासाठी केलेल्या विनवणीच्या वृत्ताने बाजाराने अखेर तेजी नोंदविली. कोळसा खाण लिलाव आणि रिझव्‍‌र्ह बँकेची संभाव्य व्याजदर कपातसारख्या स्थानिक घडामोडींनीही निर्देशांकांनी वेग घेतला.
’ श्रीकांत चौहान,
प्रमुख (तांत्रिक संशोधन), कोटक सिक्युरिटीज