‘सुकन्या’आणि ज्येष्ठ नागरिकांना १ ऑक्टोबरपासून लाभ

अल्पबचत योजनांवरील व्याजदर तिमाहीगणिक निर्धारीत करताना केंद्र सरकारने, येत्या १ ऑक्टोबरपासून पाव टक्क्यांहून अधिक व्याज देऊ केला आहे. या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेसह, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), पाच वर्षे मुदतीचे किसान विकास पत्र तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश आहे.

व्यापारी बँकांमधील ठेवींचे दर वाढत असताना, जवळपास सर्वच अल्पबचत योजनांवरील व्याजदर हे तब्बल सहा वर्षांनंतर वाढविण्यात आले आहेत. वाढीव व्याज दर हे १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ कालावधीसाठी लागू असतील.

एप्रिल २०१५ पासून अस्तित्वात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील वार्षिक व्याजदर सध्याच्या ८.१ टक्क्यांवरून थेट ८.५ टक्के करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत योजनांवरील व्याजदर ८.३ टक्क्यांवरून ८.७ टक्के करण्यात आला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर आता ७.६ टक्क्यांऐवजी वार्षिक ८ टक्के व्याज मिळेल. यापूर्वी २०१२ मध्ये पीपीएफवर सर्वाधिक ८.८ टक्के व्याज होते. किसान विकास पत्रावरील व्याजदर ०.४ टक्क्याने वाढवीत ते ७.७ टक्के झाले आहेत. मात्र मुदत कालावधी ११८ महिन्यांवरून ११२ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. पाच वर्षे मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ८ टक्के व्याजदर लागू होईल. तर बचत ठेव योजनांवरील सध्याचा ४ टक्के व्याजदर स्थिर ठेवण्यात आला आहे.

विविध योजनांवरील व्याजदर बाजारनिहाय निश्चित करताना त्यांचे दर तिमाहीला निर्धारणाची प्रक्रिया केंद्र सरकारने एप्रिल २०१६ पासून लागू केली. जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये हे दर काही प्रमाणात कमी केल्यानंतर गेल्या दोन तिमाहीत त्यात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.