वडाळा, कांजूरमार्ग, भिवंडी या परिसरासह काही ठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु असून बीकेसी संकुल स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी आणि त्यात आणखी निवासी क्षेत्रही ठेवण्यासाठी लवकरच पावले टाकण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी येथे दिली. तर ‘स्मार्ट सिटी’ ची उभारणी पीपीपी मॉडेलनुसारच केली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले.
देशात १०० स्मार्ट सिटीची उभारणी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. मुंबई महानगर क्षेत्रात किती स्मार्ट सिटी विकसित करता येतील, यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. बीकेसीचा विकास त्याधर्तीवर करण्याची योजना आहे. त्यामुळे तेथे वायफाय, इलेक्ट्रॉनिक पार्किंग सुविधा, सौरऊर्जेवरील दिवे, उत्तम रस्ते, यासह अनेक उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे मदान यांनी सांगितले. बीकेसीच्या कलानगर, कुल्र्याच्या दिशेकडून असलेल्या प्रवेशद्वारामध्ये वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणावर होते. ती दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मदान यांनी दिली. तेथे फूड प्लाझा, रेस्टॉरंट उभारली जातील आणि रात्री उशिरापर्यंत गजबज राहील व कामकाज सुरु राहील, अशा पध्दतीने नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवासी विभाग अधिक असलेल्या स्मार्ट सिटीमध्ये चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा आदी सुविधाही उच्च दर्जाच्या ठेवाव्या लागणार आहेत. पण केंद्र सरकारकडून या प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी संपूर्ण आर्थिक सहकार्य मिळणार नसून ते पीपीपी मॉडेलनुसारच राबवावे लागणार आहेत. केंद्र व राज्य सरकारकडे निधी नसल्याने त्याशिवाय पर्यायच नसल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.