प्रचंड डोकेदुखी बनलेल्या सोने-आयातीला पायबंदासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना, अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अनपेक्षितपणे सोन्यावरील आयातशुल्कात अर्थसंकल्पात कोणताही बदल न केल्याने, सोने मागणी लवकरच पुन्हा उसळी घेईल, असा कयास भारतातील सर्वात मोठय़ा सुवर्ण आभूषणांचे निर्यातदार राजेश एक्स्पोर्ट्स लि.ने व्यक्त केला आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यात सोन्याच्या देशांतर्गत किमती खालावत चालल्या असून, परिणामी लोकांकडूनही मागणी वाढत असल्याचे राजेश एक्स्पोर्ट्सचे संचालक सिद्धार्थ मेहता यांनी सांगितले. आता आयातशुल्क जैसे थे राहिल्याने किमती स्थिरावतील आणि त्यातून एकूण मागणी पुन्हा उसळी घेईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. सोन्यावरील आयातशुल्क ४ टक्क्यांवरून सहा टक्के केले गेल्याने, जानेवारी २०१३ मधील सोने आयात ही जवळपास निम्म्याने घटून ४० टनांवर आली. परंतु देशांतर्गत मागणी वाढेल त्याप्रमाणे आयातही वाढत जाईल, असे मेहता यांनी सांगितले.
राजेश एक्स्पोर्ट्सची बंगळुरू येथे ५ लाख चौरस फूटाची आणि ७०० कारागिरांच्या निवासी संकुलासह देशातील सर्वात मोठी आभूषण निर्मिती सुविधा आहे. कंपनीने उत्तराखंडमध्ये सोने शुद्धीकरण प्रकल्पही कार्यान्वित केला आहे. सर्वात मोठी सुवर्ण आभूषणांची निर्यातदार असलेली ही कंपनी येत्या काळात देशांतर्गत किरकोळ विक्रीतही मुसंडी मारण्याची योजना बनवीत असून, २०१७ पर्यंत ५०० ‘शुभ ज्वेलर्स’ ही विक्री दालने थाटण्याचे कंपनीचे नियोजन आहे, असे राजेश मेहता यांनी सांगितले. देशांतर्गत सोने मागणीत सर्वाधिक ४५ टक्के वाटा असलेल्या दक्षिण भारतातील चार राज्यांमध्येच या ५०० दालनांचे केंद्रीकरण असेल. सध्या राजेश एक्स्पोर्ट्सच्या ‘शुभ ज्वेलर्स’ची केवळ कर्नाटक राज्यात ८८ दालने कार्यरत आहेत.
राजेश एक्स्पोर्ट्सच्या एकूण उलाढालीत निर्यात महसूलाचा हिस्सा ९६ टक्के इतका आहे, ‘शुभ ज्वेलर्स’च्या महत्त्वाकांक्षी विस्तार नियोजनानंतर, निर्यात महसूल ७५ टक्के तर देशांतर्गत विक्रीचे प्रमाण २२ ते २५ टक्के इतके विस्तारेल, असा मेहता यांनी विश्वास व्यक्त केला.