स्टेट बँकेची १५,००० कोटींची वसुलीतयारी; रक्कमेसाठी अन्य बँकांचेही सहकार्य

मुंबई : कर्जाचा डोंगर वाहणाऱ्या एस्सार स्टीलला दिलेले थकीत कर्ज वसूल करण्याबाबतची तयारी स्टेट बँक करत आहे. तिच्या सहयोगाने अन्य व्यापारी बँकाही या माध्यमातून १५,००० कोटी रुपये उभारण्याच्या आशेत आहेत.

एस्सार स्टीलला दिलेले व थकीत असलेले १५,४३१.४४ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँक बँका, मालमत्ता पुनर्बाधणी कंपन्या, बिगर बँकिंग वित्त कंपन्या, गुंतवणूकदार संस्था आदींकडून स्वारस्य तपासून पाहत आहेत. यासाठी कंपनीला कर्ज देणाऱ्या अन्य बँकांनीही हाच उपाय शोधला आहे. ९,५८७.६४ कोटी रुपयांच्या राखीव किंमतीद्वारे १५,००० हून अधिकचे थकीत कर्ज परत मिळविण्याच्या प्रयत्नाता या बँका आहेत.

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या अहमदाबाद खंडपीठाने अनुत्पादित मालमत्ता वसुलीबाबतचा आराखडा मंजूर केल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे. यामार्फत किमान ११,३१३.४२ कोटी रुपये वसूल होण्याची बँकेला आशा आहे. इ-लिलाव पद्धतीने याबाबतची प्रक्रिया ३० जानेवारी रोजी पार पाडली जाणार आहे. याबाबतचे सर्व अधिकार स्टेट बँकेने राखून ठेवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच निविदेबाबतचा अंतिम निर्णयही बँकेकडेच असेल, असेही सांगण्यात आले.

सप्टेंबर २०१८ मध्ये स्टेट बँकेने एस्सार स्टीलच्या मालमत्ता पुनर्बाधणी कंपनीला विक्रीचा निर्णय मागे घेतला होता.

याबाबत राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरणाने बँकांना दुसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया ग्राह्य़ धरण्यास सांगितले होते. न्युमेटल व वेदांता यांनी त्या प्रक्रियेत भाग घेतला होता.

स्टेट बँकेसह विविध बँकांचे ४९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकविणाऱ्या एस्सार स्टीलविरोधात नादारी व दिवाळखोरी संहितेंर्गत प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्सेलरमित्तल कंपनीने एस्सार स्टीलकरिता ४२,००० कोटी रुपयांची बोली पहिल्यांदा लावली होती. तर अतिरिक्त ८,००० कोटी रुपये कंपनीत कार्यरत भांडवल म्हणूनही तयाही दर्शविली होती.

एस्सार स्टीलबाबतच्या अर्सेलरमित्तलचा दावा पहिल्यांदा मान्य करण्यात आल्यानंतर वेदांता व न्युमेटलने घेतलेला दुसऱ्या सहभाग ग्राह्य़ धरण्यास नंतर सांगण्यात आले.

कर्जसंकटातून बाहेर काढण्यासाठी जेटकरिता स्टेट बँकेचा आराखडा

मुंबई : वाढते कर्ज असलेल्या व कर्मचारी, वैमानिकांचे वेतन देण्यात अपयश आलेल्या जेट एअरवेजला अर्थसंकटातून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँकेसह प्रमुख व्यापारी बँका आराखडा तयार करत आहे.

नागरी हवाई वाहतूक कंपनीतील संचालक मंडळाच्या बदलासह कंपनीतील समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण अनुसरले जाण्याची चर्चा सुरू आहे. कर्ज पुनर्बाधणी, निधी उभारणी आदी उपायही चाचपडून पाहिले जात असल्याचे कळते. जेट एअरवेजने काही दिवसांपूर्वी बँकांचे कर्ज तसेच व्याज थकविल्याचे जाहीर केले होते. कंपनी यापूर्वी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन देण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान, कंपनीच्या भागीदाराकडून हिस्सावाढीची चर्चा सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. परिणामी जेट एअरवेजचे समभाग मूल्य बुधवारी कमालीचे रोडावले. तसेच नागरी हवाई वाहतूक कंपनीतील भागीदार एतिहाद ही जेट एअरवेजमध्ये कमी मूल्यदराने हिस्सा खरेदी करण्याची चर्चा सुरू झाली आहे.