मुंबई : सकारात्मक जागतिक घडामोडी आणि कंपन्यांच्या दमदार तिमाही कामगिरीतून प्रेरणा घेत गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीच्या बळावर भांडवली बाजाराच्या मुख्य निर्देशांकांनी सलग तिसऱ्या दिवशी दौड कायम राखली.

भारतीय चलन रुपयाची अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सुरू राहिलेल्या सरशीने बाजारातील खरेदीच्या वातावरणाला बळ दिले. शुक्रवारी २७ पैशांच्या कमाईसह रुपयाने प्रति डॉलर ७३.५१ या पातळी गाठली आहे.  परिणामी, शुकवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स २५६.७१ अंशांच्या कमाईसह ४९,२०६.४७ या पातळीवर स्थिरावला. त्याच वेळी निफ्टी निर्देशांकाने गुरुवारच्या तुलनेत ९८.३५ अंशांची नव्याने भर घालत, दिवसअखेर १४,८३२.१५ ही पातळी गाठली.

मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात ३१ टक्क्यांच्या उमद्या वाढीसह तो ५,६६९ कोटी रुपये नोंदविणाऱ्या आघाडीची गृहवित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडचाच समभाग शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ नोंदविणारा समभाग ठरला. एचडीएफसीच्या समभागाने पावणेतीन टक्क्यांची वाढ साधली. महिंद्र अँड र्मंहद्र, बजाज फिनसव्र्ह, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट हे अन्य चांगली कमाई करणारे समभाग होते.

चालू सप्ताहात सेन्सेक्सने एकंदर ४२४.११ अंशांनी (०.८६ टक्के) मुसंडी मारली आहे, तर निफ्टी निर्देशांकाची साप्ताहिक कमाई ही १९२.०५ अंश (१.३१ टक्के) अशी राहिली आहे. धातू उद्योगातील समभागांना आलेली झळाळी हे आठवड्यातील व्यवहाराचे खास वैशिष्ट्य राहिले. धातू क्षेत्रातील मिड-कॅप समभागांची कामगिरी तेजाळलेली राहील, असा जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांचा होरा आहे.