देश-विदेशात ५५ क्लब्ज आणि साडेतीन लाख सदस्य-संख्या असलेल्या क्लब आणि रिसॉर्ट्सची शृंखला कंट्री क्लब इंडिया लि.ने भारत, श्रीलंका, थायलंड व आखाती देशांपाठोपाठ जागतिक स्तरावर अधिक विकसित अशा ब्रिटन व अमेरिकेत आपले अस्तित्व निर्माण करण्याचे नियोजन आखले आहे.
कंट्री क्लबने मार्च २०१३ अखेर आधीच्या वर्षांच्या तुलनेत २७% वाढीसह रु. ४७५.६९ कोटींचे महसुली उत्पन्न कमावले, ज्यापैकी निम्मा महसूल हा भारताबाहेरील व्यवसायातून कंपनीने मिळविला आहे. अलीकडेच ब्रिटनमध्ये कंपनीने आपले प्रातिनिधिक कार्यालय सुरू करून, तेथून सदस्य-नोंदणीसाठी ‘कंट्री क्लब फॉरच्युन’ नावाचे क्लब कार्ड प्रस्तुत केले आहे. ब्रिटन तसेच अमेरिकेत शिकागो येथे नव्या क्लबसाठी कंपनी योग्य अशा मालमत्तांच्या शोधात असल्याचे कंट्री क्लबचे अध्यक्ष वाय. राजीव रेड्डी यांनी सांगितले.
अमेरिका-युरोपमधील सध्याच्या आर्थिक मरगळीचे वातावरण पाहता, कंपनीला तुलनेने कमी मोबदल्यात चांगल्या मालमत्ता मिळविता येतील. त्यामुळे गरज पडल्यास तेथील विस्तार नियोजनावर अधिक गुंतवणुकीचीही तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. कंपनी रु. ३५० कोटींच्या गुंतवणुकीची दीघरेद्देशी विस्तार योजना राबवीत असून, अलीकडेच तिने लोकांच्या तंदुरूस्तीची काळजी वाहताना फिटनेस सेंटर्सच्या व्यवसायात प्रवेश करून टेनिसपटू सानिया मिर्झाला सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले आहे. अवघ्या सहा महिन्यांत देशभरात १४ फिटनेस सेंटर्सचे जाळे कंपनीने स्थापित केले आहे.