मुंबई : टाटा म्युच्युअल फंडडाने टाटा क्वांट फंड गुंतवणुकीस प्रस्तुत केल्याची मंगळवारी पत्रकार परिषदेत घोषणा केली. टाटा क्वांट फंड हा संख्यात्मक रणनीती आधारित फंड आहे. उल्लेखनीय म्हणजे या फंडात समभाग निवडीसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) समर्थ मशीन लर्निंगची मदत घेतली जाणार आहे. ३ जानेवारीपासून खुल्या झालेल्या हा फंड प्रारंभिक गुंतवणुकीसाठी १७ जानेवारीपर्यंत खुला असेल.

टाटा म्युच्युअल फंडाने संख्यात्मक विश्लेषणावर आधारित विकसित केलेल्या रणनीतीचा वापर समभाग निवडीसाठी क्वांट फंडात केला जाईल. ‘एस अँड पी बीएसई २०० टीआरआय’ हा या फंडाचा मानदंड निर्देशांक असून, या निर्देशांक सहभागी समभाग आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह फंडातून गुंतवणूक केली जाईल. मानदंड असलेल्या निर्देशांकापेक्षा निरंतर चांगले उत्पन्न मिळवणे आणि नकारात्मक, निरपेक्ष परतावा टाळण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे. सध्या या फंडासाठी चार ते पाच रणनीती फंड घराण्याने विकसित केल्या असून एकावेळी यापैकी एक रणनीती वापरण्यात येईल.

शैलेश जैन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ‘संगणकाची मोठी शक्ती असून संगणक मोठय़ा संख्येने उपलब्ध आधार बिंदू वापरून एका निष्कर्षांप्रत येऊ शकतात. टाटा क्वांट फंडात मानवी भावना टाळून केवळ संगणकाच्या साहाय्याने संख्यात्मक विश्लेषण आधारित समभाग गुंतवणुकीची सुरुवात नव्या दशकापासून करण्याचा आमचा उद्देश आहे,’ असे प्रतिपादन टाटा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापैकीय संचालक प्रतीप भोबे यांनी केले.

आगामी काळ ‘मिड कॅप’चा!

नव्या वर्षांत अर्थव्यवस्था वाढीच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे. मिड कॅप समभागांची कामगिरी थेट अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराशी निगडित असल्याने पुढील एक-दोन वर्षांनंतर मिडकॅप फंड चांगला नफा देतील, असा आशावाद टाटा म्युच्युअल फंडाचे समभाग गुंतवणुकीचे प्रमुख राहुल सिंग यांनी व्यक्त केला. त्यासाठी आजपासून हे फंड गुंतवणुकीचे भाग असायला हवे, असे त्यांनी सांगितले.