भारताच्या अल्प पतदर्जावर सलग  १४ व्या वर्षी ‘एस अँड पी’ ठाम

नजीकच्या काळाविषयी दृष्टिकोन स्थिर राखत, जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने भारताचे सार्वभौम पतमानांकन पुन्हा ‘बीबीबी – (उणे)’ असे कायम ठेवले आहे. देशाला बहाल केला गेलेला पतदर्जा गुंतवणूकयोग्यतेच्या दृष्टीने सर्वात तळच्या श्रेणीवरील असून, अमेरिकी संस्थेकडून तो सलग १४ व्या वर्षी कायम ठेवण्यात आला आहे.

भारताचा हा सार्वभौम पतदर्जा दीर्घावधीत अर्थव्यवस्थेची वाटचाल सरासरीपेक्षा चांगली, सकल राष्ट्रीय उत्पादनांत सातत्यपूर्ण वाढ, मजबूत बाह्य़ स्थिती आणि वित्तीय स्थिती विकसित होत असल्याचे दर्शविते, असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जमेच्या बाजू आहेत, तशा काही कमजोर बाबींवर तिने बोट ठेवले आहे.

धोरणात्मक स्थिरता आणि गरज पडल्यास तडजोडीची लवचीकता राखणारी लोकशाही व्यवस्था हे भारताचे सामथ्र्य आहे. त्या उलट निम्नतम दरडोई उत्पन्न आणि कमकुवत वित्तीय रचनेत भर म्हणून सरकारची वाढती उसनवारी आणि जमा व खर्चातील वाढती तफावत अर्थात तूट या देशाच्या उणिवा असल्याचे एस अँड पीने म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२२ च्या उत्तरार्धात देशाचे अर्थचक्र रुळावर येणे जमेला धरून. चालू आर्थिक वर्षांसाठी देशाची अर्थव्यवस्था ९.५ टक्के दराने वाढ साधेल, असे एस अँड पीचे भाकीत आहे. अर्थात, गेल्या वर्षांतील अर्थव्यवस्थेच्या उणे ७.३ टक्के अशी अधोगती दर्शविणाऱ्या कामगिरीचा आधार घेऊनच यंदाची ही वाढ असेल, अशी पुस्तीही तिने जोडली.